एॅगाथा ख्रिस्तीची मुलखावेगळी कहाणी

एॅगाथा ख्रिस्ती जर प्राचीन काळात जन्मली असती आणि एखाद्या चित्रकारानं तिचं चित्र काढलं असतं तर मला वाटतं, त्यानं तिच्या चेहऱ्याभोवती वलय काढलं असतं. पण ती विसाव्या शतकातली असल्यामुळं आपण तिला नाना विशेषणं बहाल करतो. रहस्यराणी (क्वीन ऑफ क्राइम), म्हणून प्रसिद्ध असलेली, हरक्यूल पॉयरॉ, मिस् मार्पल यांच्या सारखे जगप्रसिद्ध गुप्तचर रेखाटणारी रहस्यकथा लेखिका, पंचाऐंशी वर्षं जगूनही वयाच्या पंचाहत्तराव्या वर्षी आपलं जगणं पुरं झालं असं तृप्तीनं सांगणारी स्त्री, जगाच्या कानाकोपऱ्यातून आबालवृद्धांना आपल्या कथा कादंबऱ्यांनी लुब्ध करणारी लेखिका- एॅगाथा ख्रिस्ती !
एॅगाथा ख्रिस्ती स्वतः म्हणते त्याप्रमाणे तिनं रंगवलेली पात्रं म्हणजे तिला भेटलेली पात्रं आणि स्वप्नरंजन यांचा मिलाफ आहे.
एॅगाथाची भावंडं तिच्याहून बरीच मोठी. तिचा भाऊ मॉंटी तर तिला फाससा आठवतच नाही. कुठंच फारसा यशस्वी न झालेला, एककल्ली, आणि स्वतःचं आयुष्य पुरेपूर भोगण्याची इच्छा असल्यानं इतरांचा अजिबात विचार न करणारा मॉंटी. एॅगाथाची बहीम मॅज एॅगाथाच्या बालनजरेनं तशी परिपूर्ण सुंदर दिसणारी, सुंदर पत्र लिहिणारी, व्यवस्थित. मॅज म्हणजे आदर्श. मॅज जर म्हणाली, "अमुक एक गोष्ट मला येत नाही .." तर ती आपल्याला काय येणार...हा एॅगाथाच्या मनात येणारा पहिला विचार.

वडिलांसोबत लहानगी एॅगाथा
एॅगाथाचे आई-वडील म्हणजे अगदी सुखी जोडपं. एका घटस्फोटाचं दुःख भोगलेल्या एॅगाथाच्या दृष्टीनं तिनं आयुष्यात जी तीन-चारच सुखी जोडपी पाहिली आहेत, त्यापैकी तिच्या आई-वडिलांचं प्रथम क्रमांकाचं. तिचे वडील हुषार नव्हते. आजकालच्या काळाच्या दृष्टीनं कुठलंही काम करू शकतील असे नव्हते. " घरचं उत्पन्न येतंय, मग काय करायचंय काम करून.. " या सुखासीन वृत्तीचे. मित्र जमवावेत, पत्ते खेळावेत, क्लबमधे जावं, फिरायला जावं मस्त खावं प्यावं बस्स ! पण आजकालच्या काळात लक्षात न घेतला जाणारा त्यांचा मोठा गुण म्हणजे लोकांशी जुळवून घेण्याची त्यांची शक्ती.
एॅगाथाची आई म्हणजे थोडंसं वादळी व्यक्तिमत्व होतं. मुलांची शिक्षणं, मुलांना कसं वाढवावं हे ठरवणं ही तिनं स्वतःची जबाबदारी मानली होती. एॅगाथाच्या जन्माच्या वेळी आईच्या मनानं घेतलं होतं, " लहान मुलांना शाळेच्या कोंडवाड्यात घालणं बरं नाही." आणि म्हणून एॅगाथाला शाळेत असं कोणी घातलंच नाही. ब्रायटनला सेंट लॅरिन्सेस स्कूलच्या वसतीगृहात तिला ठेवलं होतं. त्या काळात मुलीला होस्टेलमधे ठेवणारे आई-वडील म्हणजे पुढारलेले पालक समजले जात.
पूर्वी आईला मुलांच्या शिक्षणाबद्दल कळवळ होती. पण एकाएकी तिचे विचार बदलून मूल आठ वर्षांचं होईपर्यंत त्याला वाचायला शिकवणं हे मेंदू आणि डोळ्यांच्या दृष्टीनं वाईट असं तिचं मत झालं होतं.
पण छोट्या एॅगाथाला तिची दाई-तिची नर्सी- वाचून दाखवे. गोष्ट आवडली की एॅगाथा त्या शब्दांचा अर्थ लावायचा
प्रयत्न करी. बाहेर फिरायला गेल्यावर दुकानावरच्या पाट्या नर्सीला वाचायला सांगे. आणि असं करता करता, एक दिवस
हाताशी मिळालेलं पुस्तक एॅगाथा वाचू लागली. त्या आनंदात नर्सीलाली तिनं ते वाचून दाखवलं, दुसऱ्या दिवशी नर्सीनं
स्वतःच काही गुन्हा केला असा सुरात आईला बातमी दिली " एॅगाथाला वाचता यायला लागलं हो... " आईला अतीव दुःख झालं ! अशी ही एॅगाथाची आई- क्लारा मिलर.

एॅगाथाची आई क्लारा मिलर
क्लारा मिलर धार्मिक होती. पण ती जे वाचे, ऐके त्यानं तिची मतं बदलत. एकदा तिला रोमन कॅथॉलिक धर्माची मतं पटली होती. त्यानंतर थिऑसॉफिस्ट म्हणून काही काळ ती वावरली. पण एॅनी बेझंटचं भाषण आवडलं नाही म्हणून तिनं तो मार्ग सोडला. झोरास्ट्रियन म्हणूनही तिला काही काळ वावरावंसं वाटलं होतं. त्यानंतर तिला "चर्च ऑफ इंग्लंड"च चांगलं असं वाटू लागलं होतं.
क्लाराच्या विचारांना कुणी महत्व देत नसे. किंबहुना त्यांची उपेक्षाच होत असे. पण काही वेळेला तिचे विचार इतके योग्य आणि संकटाच्या वेळी मार्ग दाखवणारे असत की लोकांना त्याचं आश्चर्य वाटावं. आपल्या मुली इतकं जगात कुणी शहाणं नाही, आणि त्यांनी काहीही हाती घेतलं तरी त्यांना ते उत्तम जमेल असं तिचं प्रामाणिक मत होतं. त्यामुळे जेव्हा एॅगाथानं आपण रहस्यकथा लिहिणार असं सांगितलं, तेव्हा तिनं मुळीच आश्चर्य दाखवलं नाही. कारण तिला आश्चर्य वाटलंच नव्हतं ! आई मनकवडी आहे असं मॅजला वाटे. ती म्हणत असे "एखादी गोष्ट आईला सांगायची नसेल, तर ती खोलीत असताना ती गोष्ट मी मनातही आणत नाही. आई ती केव्हाच ओळखत असे. !"
अशा घरात वाढल्यामुळे एॅगाथाच्या स्वतंत्र बुद्धीला चांगलीच चालना मिळाली. स्वतःचंच जग तयार करायचं, त्यात स्वतःला गुरफटवून घ्यायचं आणि आनंद मिळवायचा, अशी सवय एॅगाथाला लागली.
खेळायला बरोबरची मुलं नव्हती. पण घराची-एॅशफील्डची-बाग, स्वप्नरंजनानं उभी केलेली मांजराची पिल्लं, आणि तिनं तयार केलेली पात्रं एॅगाथाला खेळगडी म्हणून पुरेशी वाटायची. क्लोव्हर, ब्लॅकी आणि इतर काही पिल्लं आणि त्यांची आई- तिचं एॅगाथानं मिसेस बेन्सन म्हणून नाव ठेवलं होतं- हे कुटुंब. कॅप्टन बेन्सन त्या पिल्लांचे वडील समुद्रावर खलाशी आहेत. त्यामुळे ते कुटुंब हलाखीच्या परिस्थितीत आहे, अशी कल्पना ती करी.
एकदा कॅप्टन बेन्सन खूपखूप संपत्ती घेऊन आले आणि त्या कुटुंबाची वाईट परिस्थिती संपली, असा हा एॅगाथाचा मांजर-मांजर खेळ! ती मांजरं एकमेकांशी बोलत, तिच्याशी बोलत.
तिच्या या स्वप्नातल्या खेळगड्यांपैकी आणखी काही पात्रं म्हणजे मिसेस ग्रीन आणि तिची शंभर मुलं. ती नक्की काय आहेत, मुलं आहेत का कुत्र्याची पिल्लं या बद्दल एॅगाथाची कधी खात्री झाली नाही.
एॅगाथाचं सगळ्यांत आवडतं खेळणं म्हणजे खेळायची रिंग. ती हातात मिरवत एॅगाथा क्षणात मर्दुमकी गाजवायला निघालेला सरदार व्हायची, तर क्षणात मांजर-मांजर खेळातलं क्लोव्हर मांजर होऊन तुरुंगातून सुटायची. नाहीतर इंजिन ड्रायव्हर, गार्ड, प्रवासीही व्हायची. बागेत तीन वेगवेगळ्या प्रकारच्या रेल्वे लाइन्स कल्पून "आता उतरा, इथं गाडी बदला" असा ती "आगगाडी-आगगाडी" खेळ खेळायची. या खेळांत तिचे तासच्या तास, दिवसच्या दिवस जायचे.
पहिलं पुस्तक लिहितानाचे अनुभव सांगताना एॅगाथानं तिच्या या मांजर-मांजर खेळण्याचा हा नवा प्रकार म्हणून तिच्या पुस्तकातल्या पात्रांचा एकमेकांशी बोलण्याचा उल्लेख केला आहे.
एॅगाथा पाच वर्षांची झाल्यावर मॅज पॅरिसहून "फिनिश" होऊन आली. ती आणि एॅगाथा यांचा एक खेळ चालेः मोठी बहीण मोठी बहीण. " कल्पना करा की या दोघींच्याहून एक मोठी बहीण आहे आणि ती कधीकधी घरी येते. ती दिसते मॅज सारखी पण तिचा आवाज वेगळा आहे. एका गुहेत ती राहते आणि वेडी आहे !" मॅज वेगळा आवाज काढून बोले " मी कोण आहे ठाऊक आहे का तुला ? मी तुमची मोठी बहीण. मी मॅज आहे असं नाहीना वाटलं तुला ?"

मोठी बहीण मॅज
त्या वेळी एॅगाथाला मॅजची भीती वाटे. काही दिवस झाले, की मात्र ती मॅजला विचारे " आपली मोठी बहीण केव्हा येणार ग ?" त्या साठी चांगले दोन दिवस तिला वाट पहावी लागे आणि मग एॅगाथाच्या नर्सरीच्या दारावर आवाज होई- " येऊ का ग आत ? मी तुझी मोठी बहीण आल्येय..."
या वरूनच एॅगाथानं त्यावेळी एक गोष्ट लिहिली होती. सोपे शब्द वापरले होते. त्या वेळी शब्दांचं स्पेलिंगही तिला नीट येत नव्हतं. नोबल लेडी मॅज आणि ब्लडी लेडी एॅगाथा आणि एका किल्ल्याच्या वारसासाठी मारामारी, अशी या गोष्टीची पात्र कल्पना होती.
एॅगाथा ख्रिस्तीची पहिली कादंबरी " द मिस्टेरियस अफेअर एॅट स्टाइल्स." बऱ्याच वेळा साभार परत येऊन ती प्रकाशित झाली होती. माहिती नसलेल्या लेखकाच्या पुस्तकाच्या ३००० प्रती खपणं काही वाईट नव्हतं. पण तिला पैसे मात्र मिळाले होते - पुरे २५ पौंड ! वीकली टाइम्सनं या पुस्तकाचं हप्त्या हप्त्यानं प्रकाशन करण्याचं ठरवलं होतं. साधारणतः सातव्या पुस्तकानंतर एॅगाथा लोकांना माहिती झाली. १९२६ सालच्या " दि मर्डर ऑफ रॉजर एॅक्राइड " या कादंबरीनं तिला हात दिला. याच सुमारास तिचं आणि तिच्या पतीचं, आर्चिबाल्ड ख्रिस्तीचं, बिनसलं होतं. दुसऱ्या स्त्रीच्या मागे लागून आर्चीनं एॅगाथाला सोडलं होतं. याचा परिणाम म्हणून कि काय, एॅगाथा नाहीशी झाली. दहा दिवसांपर्यंत तिचा कुणाला पत्ता लागला नव्हता. तिची रिकामी गाडी एका खेड्यात रस्त्याच्या कडेला सापडली होती. पोलिसांनी जंग जंग पछाडून अखेर हॅरिगेटला एका हॉटेलमधे तिला गाठलं. आश्चर्य म्हणजे आर्चिबाल्ड ज्या स्त्रीच्या मागे होता, त्या स्त्रीच्या नावाखाली एॅगाथा त्या हॉटेलमधे रहात होती ! सगळीकडे या घटनेला प्रसिद्धी मिळाली. एॅगाथाच्या मृत्यूनंतर या घटनेवर "एॅगाथा" या नावानंच चित्रपट देखील निघाला. एकानं तर एॅगाथाच्या या नाहीशा होण्याचा संबंध " जाहिरातबाजीची एक पद्धत " म्हणून " मर्डर ऑफ रॉजर एॅक्राइड "च्या वाढलेल्या खपाशी लावला. आपल्या आत्मचरित्रात मात्र या घटनेचा उल्लेख एॅगाथानं हेतुपुरस्सर टाळला आहे. आठवणी आनंद देणाऱ्या असतात तशा दुःख देणाऱ्याही असतात. दुःख देणाऱ्या आठवणींना मागे टाकायचं असतं, असं ती एकदा म्हणते, त्यामागे ही आठवण आत्मवृत्तात न घालण्याचं कारण दडलेलं असावं. रहस्यकथेच्या गुंतागुंतीच्या कथा गुंफणाऱ्या एॅगाथाच्या स्वतःच्या आयुष्यात तसं रहस्यमय एवढंच असावं. ती रहस्यकथा लेखिका म्हणून जरी उत्तरायुष्यात जगभर चमकली असली तरी ती रहस्यकथा लेखिका म्हणून जन्मली नव्हती. रहस्यकथांची तिला आवड होती, आकर्षण होतंच. पण म्हणून रहस्यकथालेखिका होण्याचं तिचं स्वप्न बिप्न नव्हतं. ती साध्या सरळ नियमांनी बांधलेल्या व्हिक्टोरियन काळात जन्मलेली मिलर घराण्यातली स्वप्नाळू मुलगी होती. आर्चिबाल्ड ख्रिस्तीशी लग्न करून हवाई दलातल्या अधिकाऱ्याची पत्नी म्हणून आनंदात संसार करत होती. ती रहस्यकथा लेखिका झाली ती अपघातानं. पण एकदा या लिखाणाला सुरुवात केल्यावर मात्र तिला तोच ध्यास लागला.
एॅगाथा आणि तिची मोठी बहीण मॅज- दोघींनी नवीनच बाहेर पडलेली " द मिस्टरी ऑफ द यलो रूम " नावाची रहस्यकथा वाचली होती. एका तरुण वार्ताहरानं त्याचं रहस्य उलगडलं होतं. त्या कथेबद्दल दोघींनी बरीच चर्चा केली. मॅजच्या संगतीनं एॅगाथानं " शेरलॉक होम्स " वाचला होता. पॉल बेकच्या गोष्टीचंही त्यांना आकर्षण वाटलं होतं. तेव्हा एॅगाथानं मॅजला म्हटलं " मला एकदा एक रहस्यकथा लिहावीशी वाटते. "
" तुला कसं जमणार ते ? रहस्यकथा लिहिणं किती अवघड असतं, मलाही जमलं नाही. " असं म्हणून मॅजनं त्यावर पडदा टाकला होता, आणि एॅगाथाला हे रहस्यकथालेखन जमणार नाही यावर पैज लावली होती. पण " मी रहस्यकथा लिहिणार " हे स्वतःचंच वाक्य एॅगाथाच्या मनाच्या कोपऱ्यात पक्कं दडून बसलं होतं.
महायुद्धाच्या काळात इंग्लंडमधे सर्वांचंच आयुष्य बदलून गेलं. तरुण मुलींनी दवाखान्यात जाऊन रुग्णांची सेवा करायची ही कल्पना सभ्य घरात सहन होण्यासारखी नव्हती. पण चांगल्या घरातले तरुण धारातीर्थी पडत होते, दवाखान्यात त्यांच्या शुश्रुषेची, देखभालीची गरज होती. एॅगाथानं त्या काळात औषध तयार करण्याच्या कामापासून ते रोग्यांची पत्रं लिहून देणं, त्यांची शुश्रूषा करणं इथपर्यंतची सगळी कामं आनंदानं पत्करली होती. तिचा पती आर्चिबाल्ड हा ही त्यावेळी आघाडीवर लढत होता. वेगवेगळ्या प्रकारची विषं औषधं देण्याच्या कामातच तिच्या नजरेला पडली. त्यावरून विष देऊन खून करण्याची कल्पना तिला रहस्यकथेत वापरावीशी वाटली. तेव्हा काम फार नव्हतं. काम करून फावल्या वेळात तिच्या डोक्यात या रहस्यकथेसंबंधी विचार चालत. कसा खून हवा ? कुणाचा ? कुणी केलेला ...?
एगाथाच्या मते खून तर सहज झालेला असावा. खुनी माहितीतलाच जवळपासचाच असावा. तरीही तो खुनी असं स्पष्टपणे अर्थातच जाणवू नये. तिच्या डोळ्यांसमोर उभा राहिलेला खुनी काळी दाढी असलेला होता. त्यांच्या शेजारी नव्यानंच रहायला आलेल्या जोडप्यातली बायको श्रीमंत होती. नवऱ्याहून वयानं जास्त होती आणि त्या नवऱ्याची दाढी काळी होती. हीच पात्रं घ्यावीत असं एॅगाथानं ठरवलं. पण हे एवढं पुरेसं नव्हतं. आणखी खूपच मालमसाला हवा होता आणि मग एॅगाथाला जाणवलं- खरी माणसं पात्र म्हणून डोळ्यांपुढे आणणं बरं नाही. कुठंतरी हॉटेलमधे बसमधे पाहिलेली माणसं-- ज्यांना आपण व्यक्ती म्हणून ओळखत नाही अशा माणसांचा इथं उपयोग करून घ्यायला हवा.
प्रत्यक्षात खऱ्या माणसांबद्दल लिहिणं शक्य नाही. कारण पूर्णपणे आपण त्यांना कुठे ओळखत असतो ? शिवाय कथानकाच्या दृष्टीनं ती माणसं सर्व प्रकारे हवी तशी कशी मिळतील ? कुठेतरी ओझरती पाहिलेली पण कुठल्या ना कुठल्या कारणानं लक्षात राहिलेली माणसं, कथानकाच्या दृष्टीनं आपण आपल्याला हवे तसे त्यांचे स्वभाव बनवून उभी केली पाहिजेत.
मॅज चा जुना टाइपरायटर घरात होता. त्याच्यावर एॅगाथानं कादंबरी टाइप करून टाकली. त्या आधी तिनं ती हातानं लिहून काढली होतीच. निम्म्या पर्यंत ती पोचली, पण पुढे काय लिहावं, तिला मार्ग सापडेना. इथं तिची आई तिच्या मदतीला धावली. " तुला जर स्वस्थ चित्तानं लिहायचं असेल तर तू सुट्टी घे आणि घरापासून दूर जा. " एॅगाथानं टोरच्या मूरलंड हॉटेलमधे एक खोली घेतली आणि लिहायला सुरुवात केली. ती जागा शांत होती. फारच थोडे लोक त्या हॉटेलमधे रहात होते. इथं सकाळभर हात दुखेपर्यंत एॅगाथा लिहायची. मग पुस्तक वाचत जेवायचं. जेवल्यावर एकदोन तास फिरायला जायचं -- शहरापासून, लोकांपासून दूर. चालता चालता, जे उद्या लिहायचं, त्यातल्या पात्रांशी ती बोलायची, ती पात्रं एकमेकांशी बोलायची. मग घरी येऊन जेवलं की बारा तास झोप ! दुसऱ्या दिवशी सकाळी उठून लेखनाला पुन्हा धडाक्यानं सुरुवात. तिच्या लहानपणच्या मांजर-मांजर खेळाची पुनरावृत्तीच म्हणाना !
पंधरवड्याच्या सुट्टीत एॅगाथानं उरलेली निम्मी कादंबरी लिहून पुरी केली. पण एवढ्यानं संपलं नव्हतं. बराचसा भाग तिला पुन्हा लिहून काढावा लागला. विशेषतः गुंतागुंतीचा मध्यभाग.
तिच्या दृष्टीनं कादंबरी पुरी झाल्यावर तिनं " हॉडर अँड स्टॉटन " या प्रकाशकाकडे पाठवली, तिथून ती साभार परत आली आणि इतरही प्रकाशकांनी याचीच री ओढली.
काही दिवसांनी एॅगाथाचा नवरा आर्चिबाल्ड सुट्टीवर आला. त्यानं ती कादंबरी वाचली. त्याला ती आवडली. त्याचा एक मित्र " मेथुएन्स " या प्रकाशनसंस्थेचा संचालक होता. तिथं त्यानं हे पुस्तक पाठवायला सांगितलं. त्यांच्या संचालकांमुळे की काय, या प्रकाशनसंस्थेनं माझ्या कादंबरीचं हस्तलिखित जास्त दिवस ठेवून घेतलं-- जवळ जवळ सहा महिने. ते इंटरेस्टिंग आहे वगैरे म्हणून आणि इतर अनेक चांगल्या मुद्द्यांचं रसग्रहण करून " मात्र हे आमच्या प्रकाशनाच्या कल्पनेत बसणारं नाही " म्हणून परत केलं.
" बोडले हेड " या प्रकाशन संस्थेकडून एक दिवस तिला पत्र आलं, " द मिस्टेरियस अफेअर्स अॅट स्टाइल्स " या पुस्तकाच्या हस्तलिखिताच्या संदर्भात प्रकाशकांनी अॅगाथाला भेटायला बोलावलं होतं.
आपल्या आयुष्यातल्या या ऐतिहासिक भेटीबद्दल एॅगाथा लिहिते, " ज्या अर्थी मला त्यांनी भेटायला बोलावलं होतं, त्या अर्थी त्यांना माझी कादंबरी थोडीतरी आवडली असली पाहिजे. मी जॉन लेनच्या ऑफिसात गेले. साधेपणानं त्या निळ्या, व्यवहारी डोळ्यांच्या माणसानं माझं स्वागत केलं. बसायला सांगितलं. पण कुठे बसावं ? मला तर काही कळेना. सगळ्या खुर्च्यांवर नुसती चित्रंच चित्रं ठेवलेली होती. शेवटी लेननं एक चित्र एका खुर्चीवरून उचलून ठेवलं, तेव्हा कुठे मला बसायला जागा झाली. "
" लेननं मला लिखाणात बरेच बदल करायला सांगितलं. नव्या लेखकाचं लिखाण प्रसिद्ध करण्यात किती धोके असतात हेही स्वारीनं पुन्हा पुन्हा सांगितलं. मग आपल्या टेबलाच्या ड्रॉवरमधून एक करारपत्र काढलं. अखेर माझं पुस्तक प्रकाशित होणार होतं तर ! त्या करारपत्रा प्रमाणे पहिल्या २००० प्रती संपेपर्यंत मला पैसे मिळणार नव्हते. त्यानंतर छोटीशी रक्कम मला मिळणार होती."
" त्याच करारपत्रात, पुढच्या पाच कादंबऱ्या याच प्रकाशकाला दिल्या पाहिजेत ही अट त्यानं घातल्याचं मी नीट वाचलंच नव्हतं ! अर्थात या कादंबऱ्यांना थोडासा जास्त मोबदला देऊ करण्यात आला होता. मी ही लिखाणाकडे करियर या दृष्टींनं तेव्हा बघतच नव्हते. आणखी पुस्तकं लिहीणं वगैरे माझ्या डोळ्यापुढे तेव्हा नव्हतंच."
" मी धावतधावत घरी जाऊन आर्चीला ही आनंदवार्ता सांगितली आणि हॅमरस्मिथ इथं "पाले द दान्स" इथं आम्ही सेलिब्रेट करण्यासाठी गेलो. "
" त्या वेळी माझ्या बरोबर माझा बेल्जियम डिटेक्टिव्ह हरक्यूल पॉयरॉ हाही होता. फक्त मला तेव्हा ते जाणवलं नव्हतं.सिंदबादच्या मानेवर बसलेल्या भुताप्रमाणे मला तो तेव्हापासून चिकटला तो चिकटलाच ! "
शेरलॉक होम्सच्या खालोखाल जागतिक प्रसिद्धी मिळालेला हरक्यूल पॉयरॉ. एॅगाथानं या पॉयरॉला जन्माला घातलं तेव्हा तिच्या मनात रहस्यकथा लिहायची होती. योग्य असं पात्र शोधताना नुकत्याच आलेल्या बेल्जियन निर्वासितांकडे तिचं लक्ष आकर्षिलं गेलं. तो डिटेक्टिव्ह बेल्जियन झाला. या डिटेक्टिव्हच्या विचारांची झेप मोठी. ती स्पष्ट करण्यासाठी एॅगाथानं त्याचं नाव हरक्यूल ठेवलं. पॉयरॉ नाव तिनं वर्तमानपत्रात किंवा कुठेतरी वाचलं असावं. ते तिच्या मनात रुजलं, आणि अशा रीतीनं हरक्यूल पॉयरॉचा अवतार जन्मला.
हे पात्र एॅगाथानं रंगवलं तेच मुळी प्रौढ वयाचं. हरक्यूल पॉयरॉ गुन्ह्यांची माहिती असलेला निवृत्त इन्स्पेक्टर आहे. पुढे तिचं तिलाच नंतर वाटलं की, सुरुवातीलाच पॉयरॉला इतक्या वयाचं दाखवण्यात आपण चूक केली. पण पुस्तकातली पात्रं दरवर्षी एक वर्षानं मोठी होत नसतात. तसं झालं असतं तर हरक्यूल पॉयरॉनं शंभरी केव्हाच ओलांडली असती. महाभारतात जशी शंभरीच्या पुढची माणसं युद्ध करतात असं आपण वाचतो, तसा विश्वास ठेवून मग आपल्याला एॅगाथा ख्रिस्तीच्या कादंबऱ्या वाचाव्या लागल्या असत्या. या अशा शिस्तबद्ध पात्राला आकार देताना एॅगाथा ख्रिस्ती मात्र स्वतःला विसरली होती. कथेची जुळणी, पात्रांचे स्वभाव घटनांचे धागेदोरे बांधताना ती कित्येक दैनंदिन गोष्टी विसरत होती. आईनं विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं देत नव्हती. दिली तर बरोबर देत नव्हती. आजीनं सांगितलेले स्वेटरचे टाकेही तिनं उलटे सुलटे घातले. तर मॅजनं टाकायला दिलेली पत्रं भलत्याच पत्त्यांवर टाकली.
प्रसिद्धा मिळाल्यावर एॅगाथाला लोकांच्या अनेक प्रश्नांना तोंड द्यावं लागलं. " तुम्हाला कल्पना कशा सुचतात हो ?" लोकांच्या या भाबड्या प्रश्नावर " कुठे म्हणजे ? मी नेहेमी हॅरॉड्स किंवा आर्मी अँड नेव्ही स्टोअर्स मधे खरेदीला जाते. तुम्ही हवं तर मार्क्स आणि स्पेन्सरच्या डिपार्टमेंटल स्टोअर्समधे जाऊन बघा कल्पना विकत मिळतात का ते !" असं मिश्किलपणे तिला म्हणावंसं वाटलं. पण प्रत्यक्षात मात्र ती म्हणते, " माझ्या डोक्यातून वाटेल त्या कल्पना निघतात. एखाद्या कल्पनेचा लेखनासाठी उपयोग होईल असं वाटलं तर ती कथानकाप्रमाणे थापटून थोपटून घ्यावी लागते. आणि मग लिहिता येतं. प्रत्यक्ष लिहिणं म्हणजे मौज नव्हे. खरं तर तिथे जास्त कष्टच घ्यावे लागतात. आणखी एक कटकट म्हणजे लगेच ती कल्पना वापरता येणार नसेल तर पुन्हा कधी तरी वापरण्यासाठी ती लक्षात ठेवावी लागते. "
" कधी तुम्ही नाईल नदीतून बोटीने जात असता. एकदम तुम्हाला आठवतं, ती जी गोष्ट लिहायची होती, तिला ही अगदी योग्य पार्श्वभूमी आहे. कधी चेल्सिया कॅफेत तुम्ही जेवत असता. तिथं तुम्हाला दिसतं, दोन मुलींचं कडाक्याचं भांडण होऊन एकीनं दुसरीचे मूठभर केस ओढून काढले. ही कथानकाला चांगली सुरुवात आहे. एखाद्या वेळी तुम्ही ओरिएन्ट एक्स्प्रेसने जात असता. इथं तुमच्या कथानकाला चांगला प्रसंग मिळतो. कधी तुम्ही एखाद्या मैत्रिणीकडे जाता. तिचा भाऊ पुस्तक संपवून बाजूला टाकतो आणि म्हणतो, --पण मी म्हणतो मुळात त्यांनी इव्हान्सला का नाही विचारलं ? व्हाय ऑन अर्थ डिडंट दे आस्क इव्हान्स ?-- झालं, तुम्ही ठरवता पुढच्या पुस्तकाचं नाव ठरलं--व्हाय डिडन्ट दे आस्क इव्हान्स ? रोजची वर्तमानपत्र बातम्या देतात त्यांचाही लेखकाला उपयोग होतो. "
या सर्व लेखनासाठी मात्र एॅगाथाला अमुकच एक जागा हवी अशी अट नव्हती. एक टेबल आणि एक टाइपरायटर असला की पुरे! लोकांनी तिला लिहीत असलेलं फारसं पाहिलं नाही. सुरुवातीला ती सगळं हातानी लिहून मग टाइप करे. पण नंतर फक्त सुरुवातीची प्रकरणं हातानं लिहून बाकी लिखाण एकदमच ती टाइप करी. लिहिताना आपण किती लिहायचं कसं लिहायचं हे ठरवून लिहावं असा एॅगाथाचा लोकांना सल्ला आहे. " कथेची लांबी किती हवी ते लोकांची मागणी लक्षात घेऊन करायला हवं. उगीच तीस चाळीस हजार शब्दांची कादंबरी लिहिण्यात अर्थ नाही. त्या लांबीची कादंबरी आजकाल कोणालाही नको असते. प्रकाशकांना आणि वाचकांना सुद्धा. तुम्ही एखादी गोष्ट चांगली लिहिती हे जाणून घेऊन तुम्हाला आनंद मिळवायचा असतो. पण त्या बरोबरच हस्तलिखित खपवायचंही असतं. असं असंल तर लेखनाची लोकांनी मागणी करावी असा आकार त्याला द्यायला हवा. तुम्ही फक्त स्वतःसाठी लिहिणार असाल, तर गोष्ट वेगळी. पण तसं नसेल तर या धंद्याचे नियम पाळलेच पाहिजेत. तुम्ही कारागीर आहात हे तुम्ही विसरून चालणार नाही. "
एॅगाथा ख्रिस्तीनं कारागिरी चांगलीच केली. कल्पनाही चालवली. ती स्वतः रहस्यकथालेखिका असून तिनं " हे रहस्यकथेत ठीक आहे, प्रत्यक्षात असं होत नाही. " असं कित्येकदा आपल्या कथा कादंबऱ्यांत म्हटलं आहे. भन्नाट कल्पना लढवून रहस्यकथा लिहिणारा आणि स्वतःशी बडबडत फिरणारा रहस्यकथालेखक आपल्याला तिच्या " डेथ इन द क्लाउड्स " मधे भेटतो. या त्याच्या बोलण्यानं बिचाऱ्यानं आपल्यावर खुनाचा संशय काही वेळ का होईना ओढवून घेतलेला असतो. " कार्ड्स ऑन द टेबल " मधेही रहस्यकथालेखिका मिसेस ऑलिव्हर सारखी सफरचंदं खात असते. खऱ्या खुनाच्या प्रसंगी आपण आत्तापर्यंत गेलो नव्हतो याचं तिला वाईट वाटतं आणि एका तरी खुनाच्या सोडवण्याला आपला हातभार लागतोय याचं सुख वाटतं.
सत्य सांगायचं पण सगळं सत्य सांगायचं नाही हे एॅगाथाच्या लिहिण्याचं सूत्र आहे. लेखिकेनं सांगितलेल्या गोष्टीवरून तुमचे स्वतःचे निष्कर्ष काढून भलत्याच माणसाला तुम्ही खुनी ठरवलंत तर बिचारी काय करणार ? तिच्या हॉस्पिटल मधल्या कामानं तिला विषाबद्दल बरीच माहिती झाल्यामुळं बऱ्याच ठिकाणी विषप्रयोग रंगवण्यावर तिचा भर आहे. आयुष्यात लहानपणापासून तिनं खूप प्रवास केला, जग पाहिलं, त्यामुळे अनुभवांचं बरंच मोठं गाठोडं तिनं स्वतःजवळ जमवलं. मनुष्यस्वभावाचेही बरेच नमुने तिला बघायला मिळाले.
एॅागाथाचा दुसरा पती मॅक्स मॅलोवॅन याच्या बरोबर ती इजिप्तमधे पुराणवस्तुसंशोधनाच्या कामासाठी बराच काळ राहिली. ती जरा अनोळखी आणि त्यामुळे आकर्षक वाटणारी पार्श्वभूमी तिनं तिच्या कादंबऱ्यांत घेतली आहे.
एॅगाथानं स्वतः एका ठिकाणी म्हटल्याप्रमाणे रहस्यकथा-लेखनाचा एक महत्वाचा फायदा म्हणजे, विविध प्रकार हाताळता येतात. अर्थात एॅगाथानं फक्त रहस्यकथालेखनच केलं असं मात्र नाही. सुरुवातीला फ्लूमधून बरं होताना वेळ काढण्यासाठी आईनं तिला कथा लिहिणं सुचवलं. "हाउस ऑफ ब्यूटी" ही त्या काळात तिनं लिहिलेली पहिली कथा. ही रहस्यकथा मात्र नव्हती. पुढे मॅक मिलर आणि त्यानंतर नाथानिएल मिलर या नावानं तिनं लिहिलं. हे लेखन मात्र साभार परत आलं.
नावारूपाला आल्यावर एॅगाथानं कैरोच्या पार्श्वभूमीवर एक कादंबरी लिहिली. तिला तिनं " स्नो अपॉन द डेझर्ट " असं नाव दिलं. नंतर मेरी वेस्ट मॅकॉट या नावाखाली तिची प्रसिद्ध झालेली काही पुस्तकं आहेत.
मेसापोटेमियातल्या एका डाक बंगल्यात एॅगाथाला आणि तिच्या पतीला एकटं रहावं लागलं. आजूबाजूला इंग्रजी बोलणारं कुणी नाही. स्थानिक लोक फक्त खायला प्यायला आणून देत. अशा वेळी आपण कोण आहोत याचा त्या परिस्थितीत सापडलेली व्यक्ती विचार करते. या कल्पनेनं " मीटिंग हरसेल्फ " या पुस्तकाची एॅगाथानं बांधणी केली आहे. अशीच एकदा एका डाकबंगल्यात ती स्वतः अडकून पडली असतानाच्या वेळच्या विचारांचं हे प्रतिबिंब आहे. तीन दिवसात तिनं " मीटिंग हरसेल्फ " हे पुस्तक लिहून संपवलं. एकदा गंमत झाली. पन्नास हजार शब्दांचं एक पुस्तक पूर्ण झाल्यावर सहा सात वर्षं डोक्यात साचत असलेली कल्पना कागदावर उतरल्याबरोबर एॅगाथानं सुटकेचा निःश्वास सोडला आणि ती झोपी गेली. झोपली ती जवळजवळ चोवीस तास ! उठल्यावर तिनं भरपूर खाल्लं आणि मगच ती हॉस्पिटलला जाऊ शकली. त्या पुस्तकाला तिनं " एॅब्सेंट इन द स्प्रिंग " असं नाव दिलंय. हे तिच्या अतिशय आवडत्या पुस्तकांपैकी एक.
या शिवाय मॅक्स मॅलोवॅन संशोधनात गुंतलेला असताना इंग्लंडमधे तिनं " कम टेल मी हाउ यू लिव्ह " हे त्या दोघांच्या आठवणींवरचं पुस्तक लिहिलं. तिनं ते प्रसिद्ध करायचं ठरवलं मात्र, -- सिडने स्मिथ या त्यांच्या मित्राला धक्का बसला. मॅक्सला हे आवडणार नाही म्हणून त्यानं एॅगाथाला प्रकाशनापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला.
एॅगाथाचा पती सर मॅक्स मॅलोवॅन यांनी ऊर आणि निनेवेह इथं काम करून खाबुर आणि ब्राक इथं सुमेरियन संस्कृतीच्या अवशेषांवर संशोधन केलं. निमृद इथलं उत्खनन झाल्यावर कोरीव हस्तिदंत आणि इतर कित्येक गोष्टी सापडल्या. सर मॅक्सचं वैशिष्ट्य म्हणजे, नशिबानं हात दिल्यावर त्यांनी त्याचा उपयोग करून पौर्वात्त्य उत्खननात मोलाची कामगिरी बजावली. पुराणवस्तुसंशोधक होण्याची आपली इच्छा त्यानं "न्यू कॉलेजच्या" डीनला सांगितली आणि वॉर्डन फिशर कडून ओळखपत्र घेऊन तो गेला. एॅश्मोलियनच्या व्यवस्थापकाकडे त्याच दिवशी पूर्वेकडे संशोधन करणाऱ्या वुली या संशोधकाकडून उर इथल्या संशोधनासाठी मदतनिस हवा असल्याची मागणी येऊन पडली होती. याच क्षणापासून मॅक्स मॅलोवॅनचं संशोधनपर आयुष्य सुरू झालं.
लग्नानंतर एॅगाथाही बरेच दिवस या संशोधनस्थळी राहिली. " डेथ कम्ज एॅज एॅन एंड " या नावाची इजिप्तमधल्या जुन्या काळातल्या (इ.स. पूर्व २०००) एका कुटुंबात घडलेली रहस्यकथा तिनं या मुक्कामात लिहिती आहे. "मर्डर इन मेसापोटेमिया" या कादंबरीतही तिनं या पार्श्वभूमीचा उपयोग केला. पण तीत काळ आहे आजकालचा. " डेथ कम्ज एॅज एॅन एंड " मधे इम्होटेप, त्याची रखेली नेक्रेट वगैरे नावं वाचताना आपण सुरुवातीला ठेचकाळतो. पण कित्येक हजार वर्षांपूर्वीची प्रेम, मत्सर, खून यांची ही कथा आहे. इम्होटेप हा "का प्रीस्ट" उतारवय झालेला, दोन सुना, मुलं नातवंड आणि विधवा होऊन नुकतीच घरी आलेली मुलगी यांच्या घरात आपल्या नेक्रेट नावाच्या रखेलीला आणतो. त्या पाठोपाठ घराचा आनंद संपतो. इम्होटेप स्वयंकेंद्रित आहे. कर्त्या मुलांना तो मानत नाही. मुलं आपली आश्रित आहेत असं त्याचं मत. तो गावाला गेलेला असताना नेक्रेटचा खून होतो. उंच कड्याजवळ ती मेलेली सापडते. पाठोपाठ त्याची सून साटिपी ही नेक्रेट जिथून पडली त्याच कड्यावरून खाली पडून मरते. मुलगा सोबेकला विषप्रयोग होतो. मग त्याची आई इसा --जी खुनी मनातल्या मनात शोधते, तीही मरते आणि नंतर वाचकांना जिचा सर्वात जास्त संशय येतो ती हेनेटही --कुटुंबात आश्रित म्हणून स्वतः उपेक्षित राहिली असं वाटणारी-- मरते. ती मरण्याआधी इम्होटेपच्या मुलीला रेनिन्सेबला, "टोंब जवळ जा, तिथं तिचा बालमित्र आणि तिच्या वडिलांचा कारकून तिची वाट पहातोय" असं सांगते. ज्याला रेनिन्सेब भेटायला निघाल्ये, तो टोंबजवळ असणं शक्य नाही हे वाचकाला माहिती असतं. या नंतरचा भाग म्हणजे झाकली मूठ रहस्याची !
माणूस मेल्यावर त्याचा एंबाम (मसाले लावून प्रेत सुरक्षित ठेवणं) करणं आणि पुरताना बरोबर त्या व्यक्तीच्या वस्तू, दागिने ठेवणं या सर्वांची व्यवस्था करणं वगैरे या कादंबरीतल्या गोष्टी आपल्याला हजारो वर्षांपूर्वीच्या इजिप्तमधे घेऊन जातात. इम्होटेप पत्नीचा उल्लेख करताना "सिस्टर" असा करतो. एगाथानं एकदा एका ठिकाणी वाक्य घातलंय " आपण इजिप्शियन लोक मृत्यूच्या देशात जगतो. जन्मल्यापासून मृत्यूची आणि मृत्यूनंतर लागणाऱ्या सुखसोयींची तरतूद आपण करत असतो. " इम्होटेपची आई इसा ही एक एॅगाथानं रंगवलेल्या तल्लख म्हाताऱ्यांपैकी एक. तिला चालवत नाही. पण मन सगळ्या आजूबाजूच्या गोष्टी साठवत असतं. ती एकदा म्हणते, " सगळं आयुष्य हा एक विनोद आहे. सर्वात शेवटी जर कुणी हसत असेल, तर तो मृत्यू."
स्टीफन ग्रॅनव्हिल या संशोधकानं ही कादंबरी लिहिण्यासाठी एॅगाथाला भरीस घातलं. एॅगाथाला जाणवत होतं की, तसं अख्रातोन नावाचं नाटक तिनं लिहिलं तेव्हा तिनं इजिप्शियन संस्कृतीवरच्या आपल्या ज्ञानात भर घातली होती. पण कादंबरी लिहायची म्हणजे बारीक सारीक माहिती हवी. घरं, रहाणी, रीतिरिवाज माहीत हवेत. स्टीफननं आग्रह केल्यामुळे तिनं लिहायला सुरुवात केली. ती त्यानं दिलेल्या पुस्तकात एका का प्रीस्टनं आपल्या मुलांना घर-कारभाराबद्दल दिलेल्या आज्ञावजा पत्रांच्या संदर्भानं. तिला अडचण आली की ती स्टीफनला फोन करी आणि तो काही वेळी चिडतही असे. पण नंतर कित्येक पुस्तकांमधे संदर्भ बघत माहिती शोधून काढी आणि एॅगाथाला पुरवी.
एॅगाथानं स्वतःच "भन्नाट काल्पनिक" असं जिचं वर्णन केलं आहे, ती उल्लेख करण्यासारखी कादंबरी म्हणजे "पॅसेंजर टू फ्रँकफुर्ट". सर स्टॅफोर्ड उच्चभ्रू समाजातला प्रवाहाविरुद्ध पोहणारा किंचित वेगळा असा एक माणूस. चेहरा ताणून जगणं त्याला पसंत नाही. ज्याला "प्रॅक्टिकल जोक" म्हणतात तो अनुभवण्यात आनंद मानणारा, साहसाची आवड असणारा एक तरुण. फ्रँकफुर्ट विमानतळावर कंटाळून विमानाची वाट बघत बसलेला असताना एक तरुण मुलगी येऊन त्याला मदत मागते. "सर स्टॅफोर्डचा पासपोर्ट आणि ओव्हरकोट मिळाला नाही तर आपण लंडनला जाऊ शकणार नाही आणि आपला जीव घेतला जाईल." असं म्हणते. तिच्यावर उपकार करायला सर स्टॅफोर्ड आपला पासपोर्ट कोटाच्या खिशात ठेवून कोट काढून ठेवून ड्रिंक घ्यायला जातात. ड्रिंकमधे ती मुलगी झोपेचं औषध घालते. ते उठतात तेव्हा पासपोर्ट गायब झालेला ! तो कुणीतरी मारला असं सांगून पासपोर्टची अन्य व्यवस्था करावी लागते. एवढ्या काळात ती तरूण मुलगी लंडनला पोचते. सर स्टॅफोर्डना पासपोर्ट त्यांच्या पोस्टाच्या पेटीतल्या मासिकाला लावलेला परत मिळतो. सर स्टॅफोर्ड वर्तमानपत्रातल्या छोट्या जाहिरातीत जाहिरात देतातः-"३ नोव्हेंबर, फ्रँकफुर्टचा प्रवासी-लंडनमधे सहप्रवाशाला भेटा." याच स्तंभात काही काळातच उत्तर मिळतंः- "फ्रँकफुर्टचा प्रवासी-गुरुवार नोव्हेंबर ११, हंगरफोर्ड ब्रिज". या हंगरफोर्ड ब्रिजवर सर स्टॅफोर्ड जातात, आणि तिथून पुन्हा एका संगीताच्या मैफिलीला जातात. तिथे त्यांना ती मुलगी भेटते. नंतरही एका पार्टीत ती भेटते. ती त्यांना एका टोळीत ओढते. ही मुलगी - मेरी एॅन, डॅफ्ने थिओडोफन्स आणि रिनाटा झिरकोन्स्की या तीन नावांनी वावरत असते.
या प्रकरणात एक अद्भुत गोष्टीचा पत्ता लागतो. जगाला अधुनिक प्रश्नांपासून बचावण्यासाठी तरुणांनी एकत्र येऊन जरूर पडेल तर हिंसाही करायला हरकत नाही या तात्विक मुलाम्याखाली सर्व तऱ्हेच्या कलांचा आस्वाद घेणारी ही तरुण पिढी तयार केली जाते. त्यासाठी हवा तेवढा पैसा एका श्रीमंत, लठ्ठ आणि आजारी स्त्रीकडून आणि अशाच प्रकारच्या इतरांकडून ओतला जातो आहे. हिटलरचा मुलगा जिवंत आहे असं म्हणून त्याच्या नेतृत्वाखाली लोकांना आणायचं असं कारस्थान चालू आहे. हे सर स्टॅफोर्ड व त्याची मैत्रीण बघतात. तिनं लंडनमधे चोरून आणलेला जन्माचा दाखला त्या तथाकथित हिटलरपुत्राचा असतो... त्याच्या खऱ्या आईवडिलांच्या नावासकट. हे बिंग फुटल्यावर सर स्टॅफोर्ड तिला तार करतात. " गुरुवारी लग्न. पुढील आठवड्यात सेंट ख्रिस्टोफर्स अडीच वाजता. चर्च ऑफ इंग्लंड सर्व्हिस हवी की ग्रीक ऑर्थोडॉक्स ? कुठे आहेस ? लग्नासाठी कुठलं नाव ? भाची सिडिल ब्राइड्समेड होणार. खूप हिंडलो. मधुचंद्र इथेच." --फ्रँकफुर्टचा प्रवासी.
त्याला तिनं तारेनंच उत्तर दिलं, " सिव्हिल ब्राइड्समेड चालेल. ग्रेट ऑँट मॅटिल्डा मॅट्रन ऑफ ऑनर. मागणी न घालताही लग्नास तयार. मधुचंद्र कल्पना ठीक. चर्च ऑफ इंग्लंड सर्व्हिस चालेल. कुठं आहे हे सांगण्यात अर्थ नाही कारण तार मिळेपर्यंत तिथं नसेन-- मेरी एॅन."
ही कथा काल्पनिक असली तरी अशक्य नाही, असं एॅगाथा ख्रिस्तीचं म्हणणं. थोडीशी याच धर्तीवर "डेस्टिनेशन अननोन" ही कादंबरी. पॅरिसच्या परिषदेतून शास्त्रज्ञ नाहीसा होतो ! आफ्रिकेतल्या वाळवंटात एका एॅरिस्टॉइड नावाच्या करोडोपतीनं मेंदूची बँक तयार केलेली असते. -- जिवंत तल्लख मेंदूंची बँक ! तिथं टॉम बेंटरटनला-- त्या शास्त्रज्ञाला नेलं जातं. त्याची बायको त्याच्याकडे जायला निघालेली असताना मरते. तिची जागा घ्यायला हिलरीला--जगायची इच्छा संपली म्हणून आत्महत्या करायला निघालेल्या स्त्रीला-- जेसप सांगतो. जेसपनं म्हटल्याप्रमाणे तिच्यात जगायची इच्छा निर्माण होते. ती ऑलिव्हची जागा घेऊन तिच्यासारखीच लाल केसांची स्त्री म्हणून बेंटरटनकडे जाते. तिथून पळून जायचा प्रयत्न करत असताना अमेरिकन एजंट आणि टॉमच्या पहिल्या बायकोचा नातलग अँडी पीटर्स बाहेर संदेश पाठवून जज्ज, मंत्री, परदेशी वकिलातीतले वकील आणि पत्रकारांना घेऊन आलेल्या जेसप आणि इतर पोलिसांना ऐनवेळी नोकराचे कपडे घालून घेऊन येऊन मदत करतो आणि दडवलेल्या शास्त्रज्ञांना सोडवतो. बेंटरटननं बायकोचा खून करून पळ काढला होता हे ही सत्य बाहेर येतं.
एॅगाथानं आयुष्याच्या एका काळात कविताही केल्या होत्या. तिला लहानपणी चांगलं पियानोवादक व्हायचं होतं. आजीच्या कित्ता गिरवून तिनं कुशल कव्हर्सवर भरतकाम केलं होतं. ते तिचं आवडतं काम होतं. रहस्यकथा लिहायला लागल्यावर तिचं भरतकाम थांबलं. त्या भरतकामाचंच रुपांतर या लेखनात झालं असावं असं तिला वाटलं. ती पुढे मॅक्सच्या- पुराणवस्तुसंशोधनाच्या जागी राहून चांगली फोटोग्राफर झाली. त्या आधी तिनं पुतळे बनवण्याचा यशस्वी प्रयत्न केला होता. जातीवंत बुद्धीमंतानं काहीही करावं तसं या सर्व प्रकारांमधे ती थोडीफार यशस्वीही झाली होती.
भरपूर नावलौकिक एॅगाथानं मिळवला, पण ती प्रसिद्धीच्या मागे लागलेली स्त्री नव्हती. "माउस ट्रॅप" या वर्षानुवर्षं चाललेल्या तिच्या नाटकाच्या दहाव्या वर्षाच्या मेजवानीसाठी ती लंडनच्या प्रसिद्ध "सॅव्हॉय" हॉटेलात गेली. पण तिला दरवानानं आत जाऊ दिलं नाही. सामान्य दिसणारी ही स्त्री असामान्य एॅगाथा ख्रिस्ती आहे हे त्याला कसं ठाऊक असावं ? एॅगाथा ही भली ! स्वतःची ओळख करून देण्याच्या फंदात ती पडली नाही. ती बाजूला तशीच उभी राहिली. तिला ओळखणाऱ्या, पार्टी देणाऱ्यांनी तिला आत नेलं म्हणून बरं !
एॅगाथानं आपली आत्मकथा लिहिली तीतसुद्धा स्वतःच्या लिखाणाबद्दल बढाया नाहीत. उलट कितीतरी नंतर ती प्रांजळपणे म्हणते, " हल्ली हल्ली मी लेखनाकडे करियर म्हणून बघते. इतके दिवस लेखक म्हणवून घ्यावं असं वाटलं नाही. " या आत्मवृत्तात लहानपणापासून तिला भेटलेले लोक, ती गेलेली गावं, तिनं केलेला प्रवास-- आणि राहिलंच ! ती राहिली ती घरं यांचं आठवेल तसं वर्णन आहे. आर्चीनं घटस्फोट दिल्यावर पैशाची जरुरी होती, त्या वेळपासून लिहिणं आवश्यक आहे, त्यातून पैसे मिळतात म्हणून आपण लिहायला सुरुवात केली, अशीही स्वच्छ कबुली ती देते.
एॅशफील्डच्या ज्या घरात ती वाढली ते घर परिस्थितीपायी विकावं लागतं म्हणून दुःखी होणारी आणि विक्री होऊ न देणारी हळवी एॅगाथा आपल्याला तिच्या आत्मकथेत भेटते. तीच एॅगाथा मोठेपणी तेच एॅशफील्ड विकून फ्लॅट्स पडलेले पाहताना "हे असं होणारंच. जुनं सोडून नवं पत्करलं पाहिजे." असा शहाणपणा शिकलेली दिसते. तिची मुलगी रोझालिंड, आणि रोझालिंडचा मुलगा मॅथ्यू यांची लहानपणं आठवून हेलावणारी एॅगाथातली आई आणि आजीही त्यात आपल्याला भेटते. वयाबरोबर माणसाचा दृष्टिकोन बदलतो या बद्दल ती उदाहरण देते. ती तरूणपणी इजिप्तला गेली तेव्हा तिला फक्त नृत्याचे हॉल्स आणि तरुण आर्मी ऑफिसर्स जाणवले होते. तेव्हा तेच तिचं जग होतं. पुढं कित्येक वर्षांनी मॅक्सबरोबर इजिप्तला गेली तेव्हा तिला पिरॅमिड्स जाणवले. तिच्या मते हेच योग्य होतं. तरुणपणी तिला पिरॅमिड्सचं सौंदर्य आणि महत्व जाणवणं शक्य नव्हतं. प्रौढ वयात नृत्यमंदिरांबद्दल तिला साहजिकच आकर्षण राहिलं नव्हतं.
आर्चीनं एगाथाला लेखनाला उत्तेजन दिलं होतं. त्या दोघांनी बेल्चर या माणसाबरोबर कामानिमित्त बराच प्रवास केला. या बेल्चरशी दिलेला संवाद तिनं दिला आहे- "-मिस्टरी ऑफ द मिल हाउस- हे चांगलं शीर्षक आहे. " बेल्चर म्हणाला, "पण लक्षात ठेव हं! माझं पात्र त्यात पाहिजेच !"
"अरे बाबा मी पात्र कल्पनेचं घालते. तुझं पात्र नाही त्यात घालता येणार. " एॅगाथानं अडचण सांगितली.
पण बेल्चर ऐकेना. तेव्हा " तुझा खून झालेला दाखवलंय. " असं एॅगाथानं अखेर बेल्चरला त्याच्याच आग्रहावरून सांगितलं !
" पण माझा खून व्हायला मला नकोय, मला खुनी व्हायचंय." बेल्चरची चिकाटी थोर होती.
"पण का ? " एॅगाथानं वैतागून विचारलं.
" कारण खुनी हाच पुस्तकातला सर्वात इंटरेस्टिंग माणूस असतो !" बेल्चरनं शांतपणे सत्य सुनावलं. त्याप्रमाणे एॅगाथानं यूस्टेश पेडलर हे बरंचसं बेल्चरसारखं पात्र बनवलं आणि-- बेल्चरच्या इच्छेला मान देऊन -- त्याला खलनायक केलं.
स्वतःचं आर्चीशी लग्न, रोझालिंडचा जन्म, घटस्फोट, मॅक्स मॅलोवॅनची भेट आणि लग्न यांच्याबद्दल एॅगाथानं लिहिलंय. त्यावेळच्या चालीरीती प्रेमप्रकरणं आणि इतर बरंचसं काही. आयुष्यातले दोन संस्मरणीय प्रसंग ती सांगते. "इव्हिनिंग न्यूज" कडून "द मॅन इन द ब्राउन सूट" बद्दल मिळालेल्या पाचशे पौंडांचा उपयोग करण्यासाठी आर्चीनं गाडी घ्यायची सूचना केली, आणि -मॉरिस कॉले- ही गाडी मी घेतली हा एक माझ्या आयुष्यातला संस्मरणीय प्रसंग ! आणि राणी एलिझाबेथला (दुसरी) मी भेटले आणि तिच्या बरोबर जेवले तो दुसरा संस्मरणीय प्रसंग."
राणी मेरीनं आपल्या वाढदिवसाच्या निमित्तानं बी.बी.सी. वर एॅगाथा ख्रिस्तीनं नाटक दाखवावं अशी इच्छा प्रकट केली होती. त्या नाटकाचंच पुढं तिनं "माउस ट्रॅप" मधे रूपांतर केलं.
मृत्यूच्या वेळी एॅगाथाची संपत्ती १५ लाखाच्या घरात होती. शेवटी शेवटी कर जास्त भरावा लागू नये म्हणून ती वर्षाला एकच कादंबरी प्रकाशित करी. मृत्यूच्या वेळी तिच्या ७७ रहस्यकादंबऱ्या आणि कथासंग्रह प्रसिद्ध झाले होते. आणि ३५ कोटी पुस्तकांच्या प्रती खपल्या होत्या. जगातल्या जवळजवळ १५० भाषांमधून त्यांची भाषांतरं झाली. या तिच्या साहित्यावर १५ सिनेमे निघाले, आणि १७ नाटकं रंगभूमीवर आली. १५ कोटींहून जास्त रकमेची प्राप्ती या रहस्यकथा लेखनावर तिनं केली असा अंदाज आहे. "स्लीपिंग मर्डर" ही तिची कादंबरी इंग्लंडमधे प्रसिद्ध व्हायच्या आधीच तिचे अमेरिकेत पेपरबॅक पुस्तकांचे हक्क ७५ लाखांना विकले गेले होते असं म्हणतात.
प्रत्येकाचं आयुष्य म्हणजे एक स्वतंत्र कादंबरी असते असं म्हणतात. आपल्याला कादंबरीचं आकर्षण वाटतं. कारण आपल्यातलं परीकथा वाचणारं मूल कुठेतरी डोकं वर काढत असतं. कल्पनेच्या साम्राज्यात हरवून जाण्याचा प्रयत्न करत असतं. कधी सत्यापासून दूर पळण्याचा त्यात प्रयत्न असतो, कधी प्रत्यक्षात जे मिळत नाही ते कल्पनेत मिळवण्याचा. पूर्वीचा माणूस --हजारो वर्षांपूर्वीचा माणूस-- जगण्यासाठी आपसात लढत होता. जनावरं मारत होता. आजही माणसांच्या जगण्याच्या हक्कासाठी खून, दरोडे घालणाऱ्यांवर नजर ठेवलं जाते. आणि या कथा आपल्याला आकर्षित करतात. सत्याचा विजय होतो-- नव्हे व्हावा ही माणसाची भावना असते. याच आदिभावनांना एॅगाथानं खतपाणी घातलं आहे. खुनाची, गुन्ह्याची तरफदारी न करता न्यायाची बाजू घेण्याचा प्रयत्न केला आहे. एॅगाथा ख्रिस्तीनं रहस्यकथेला कुटुंबवत्सल, सभ्य आणि विचारी माणसाच्या दिवाणखान्यात मानाचं स्थान दिलं आणि असं कृतकृत्य जीवन जगल्यावर वयाच्या पंचाहत्तराव्या वर्षी --मृत्यूपूर्वी दहा वर्षं आधीच -- "माझ्या छानदार आयुष्यासाठी आणि मला मिळालेल्या प्रेमासाठी मी देवाची आभारी आहे " असं ती म्हणते, यातच सर्व काही नाही का ?


एॅगाथा ख्रिस्तीची पुस्तके
--वरील दीर्घ परिचयलेख मे १९८० च्या "हंस" मासिकात प्रसिद्ध झाला होता.