योगाचे महत्वः काल, आज आणि उद्याही
आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त झालेल्या, केंद्रीय संचार ब्यूरो आणि योग साधना मंडळ सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेत बक्षिसपात्र ठरलेला हा माझा निबंध.
शरीराचे स्वास्थ्य मनावर आणि मनाचे स्वास्थ्य शरीरावर अवलंबून असते. नाण्याच्या या दोनही बाजू खणखणीत असतील तर जीवन सफल, संपूर्ण होऊ शकते.
जून महिना आला की आपल्याला पावसाचे वेध लागतात. संपला एकदाचा उन्हाळा म्हणून आपण सुटकेचा निश्वास सोडतो आणि पावसाचे स्वागत करतो. त्याचप्रमाणे अनेक अडचणी, अनारोग्य, आळस यांना मागे टाकून योगाचा मार्ग अवलंबणाऱ्यांना प्रयत्नांती सत्, चित्, आनंद मिळतो.
२१ जून २०१५ रोजी पहिला आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा झाला. २०१४ सालच्या संयुक्त राष्ट्रांच्या (यूनोच्या) महासभेत पंतप्रधान मोदींनी मांडलेल्या योगदिनाच्या प्रस्तावाला १७७ राष्ट्रांनी पाठिंबा दिला आणि पुढील वर्षीपासून योगदिन सुरू झाला. योगदिन म्हणून हा दिवसच का? तर हा उत्तर गोलार्धात म्हणजे आपल्याकडे सर्वात मोठा दिवस असतो.
पहिल्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने २०१५ साली भारतीय रिझर्व बॅंकेने १० रुपयांचे स्मारक नाणे काढले. २०१७ साली संयुक्त राष्ट्रांच्या पोस्टल ॲडमिनिस्ट्रेशनने विशेष टपाल तिकिटे वितरित केली. पंतप्रधान मोदी आणि ८४ देशांतील मान्यवरांनी व ३५ हजारांहून अधिक जनसामान्यांनी पहिल्या वहिल्या योगदिनी नवी दिल्लीतील राजपथावर २१ योगासने करून या दिनाचा शुभारंभ केला. त्यानंतर जगभर हा दिवस योगासने, प्राणायाम करून साजरा केला जातो.
मात्र योगदिन हा एक दिवस साजरा करण्याचा खेळ नाही. योगदिनाच्या निमित्ताने होणाऱ्या कार्यक्रमात मुख्यत्वे योगासनांचा अंतर्भाव असतो. मात्र योग म्हणजे फक्त योगासने नाहीत. शारीरिक, मानसिक आध्यात्मिक तसेच सामाजिक स्वास्थ्यासाठी योग उपयोगी आहे कारण ही जीवनपद्धती आहे.
प्राचीन काळी भारतातील ऋषी- मुनींनी योगविद्येचा विकास केला. मानवाची पाच ज्ञानेंद्रिये, पाच कर्मेंद्रिये आणि मन या सर्वांचा योग्य दिशेने विकास होण्यास योगविद्या मदत करते. अध्यात्म आणि आयुर्वेद यांचा मनोज्ञ संगम योगात होतो. युज या मूळ संस्कृत धातूपासून हा शब्द बनलेला आहे. योग- जोडणारा , एकत्र आणणारा. शरीर, मन यांचा विकास करून जगण्याचे बळ देणारी ही विद्या आहे. समतोल जीवन म्हणजे योग असे श्रीमद् भगवद्गीता म्हणते. वसिष्ठ ऋषींच्या योगवासिष्ठ्याप्रमाणे संसारातील अडचणींतून तरून जाण्याची युक्ती म्हणजे योग. तो शरीर सुदृढ आणि मन सशक्त करतो.
विशिष्ट विषय
२०१५ सालापासून भारतातील काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंतच नव्हे, तर जगभर योगदिन साजरा होतो. दर वर्षी एक विषय- एक थीम घेतली जाते. २०१५ साली सुसंवाद आणि शांतीसाठी योग असा विषय घेण्यात आला होता. २०१६ साली शाश्वत विकास साधण्यासाठी योग,२०१७ साली आरोग्यासाठी योग, २०१८ साली शांतीसाठी योग, २०१९ मध्ये हृदयासाठी योग, २०२० साली घरी योग व कुटुंबासाठी योग,२०२१ साली निरोगीपणासाठी योग, २०२२ साली मानवतेसाठी योग,२०२३ साली वसुधैव कुटुंबकम् साठी योग, २०२४ साली स्वतःसाठी- समाजासाठी योग असे विषय घेण्यात आले होते. यंदा Yoga for one earth- one health – एक पृथ्वी - एक स्वास्थ्यासाठी योग हा विषय होता.
योगशास्त्रामध्ये भारतवर्षातील अनेकानेक ऋषींचे योगदान आहे. पण महर्षी पतंजलींना योगाचे जनक म्हटले जाते कारण त्यांच्या योगसूत्रांमध्ये योगाच्या विविध पैलूंचे संकलन आहे. मानवाचा सर्वांगीण विकास या योगसंकल्पनेचा मध्यबिंदू आहे. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा व समाधी अशा योगाच्या पायऱ्या म्हणता येतील.
आधुनिक काळात अमेरिकेतील हॉलिवुडमध्ये इंद्रादेवी यांनी पहिला योगास्टुडिओ उभारला. रामदेव बाबांच्या पतंजली संस्थेने गेल्या काही वर्षांत योगप्रसार मोठ्या प्रमाणात केला. स्वतः रामदेवबाबांनी देशभर जाऊन योगासनांची शिबिरे घेतली. भारतात ऋषिकेश या स्थळाला योगाची राजधानी म्हटले जाते. स्वामी रामदेवबाबांचा आश्रमही इथेच आहे.. युगानुयुगे ऋषिकेश येथे येऊन साधक योगाभ्यास करतात. पण पाश्चात्यांनी योगाभ्यासाला सुरुवात केल्यामुळे की काय भारतातही योगप्रसार होऊ लागला आहे. त्यामुळे योगाभ्यास केवळ ऋषि- मुनींपुरता सीमित राहिलेला नाही; तर सर्व वयाच्या स्त्री- पुरुषांना योगाभ्यासाची गरज वाटू लागली आहे. एक पृथ्वी- एक स्वास्थ्यासाठी योग हा यंदाचा विषय हेच सांगतो.
आजही समकालीन
आज परिस्थितीत बदल झालेला असला तरी योग जुना, अडगळीतला वाटत नाही , उलट सद्यस्थितीत योगाची गरज वाढली आहे. त्यामुळे योग आजही समकालीनच आहे.
दिवसेंदिवस आपण पाश्चात्यांच्या अंधानुकरणात धन्यता मानू लागलो आहोत. त्यामुळे आपला आहार बदलला. आधुनिकीकरणाच्या नावाखाली आपण पूर्वीपेक्षा अधिक प्रक्रियायुक्त पदार्थ खाऊ लागलो आहोत. आपल्याला भाजी भाकरी गावंढळ वाटते, तर पिझ्झा- बर्गर आपल्याला आकर्षित करतात. विविध प्रकारच्या आधुनिक साधनांमुळे आपली शारीरिक हालचाल कमी झाली आहे. चमचमीत खाण्याच्या हव्यासामुळे आपलं वजन वाढू लागलं आहे. बैठ्या जीवनशैलीमुळे भारत ही मधुमेहाची राजधानी(!) होऊ लागली आहे. रोजगारासाठी शहराचा रस्ता धरल्यावर नाती तुटण्यामुळे एकाकीपण येऊ लागले आहे. शिक्षण घेऊन रोजगार मिळावा म्हणून आपण ज्ञानाच्या नाही, तर गुणांच्या(!) मागे लागतो आणि रोजगार तर सर्वांना मिळत नाही, कौशल्यही आत्मसात करत नाही. शिक्षण घेतले म्हणून शारीरिक श्रम करण्यात कमीपणा वाटतो, पण पदव्यांच्या बळावर पोट तर भरता येत नाही अशा अडकित्त्यात आजचा तरुण आहे.
१९९१ नंतर सुरू झालेल्या मुक्त अर्थव्यवस्थेनंतर काही माणसांकडे पैशाचा ओघ मोठ्या प्रमाणात सुरू झाला. त्यातून डामडौल, चंगळवाद बोकाळला. हुंडा बंदी असली तरी हुंड्याची, वाजतगाज विवाहसोहळ्यांची मागणी वाढते आहे. परिणामी हुंडाबळी जातात. विवाहित महिलांच्या आत्महत्त्यांच्या रोजच्या वृत्तपत्रांतील बातम्या आपल्याला नेहमीच्याच वाटू लागल्या आहेत. मुलीचा जन्म हे उद्याच्या खर्चाला आमंत्रण म्हणून स्त्रीभ्रुणहत्या झाल्याने विवाहासाठी मुली मिळत नाहीत अशी परिस्थिती आहे. आपले लग्न होत नाही, मुली मिळवून द्या म्हणून तरुणांनी काही महिन्यांपूर्वी काढलेला मोर्चा आजच्या विदारक परिस्थितीचे दर्शन घडविणारा आहे.
या काही अगदी टोकाच्या घटना सोडल्या तरी वाहनांच्या वाढत्या वापरामुळे चालणे कमी, हालचाल कमी , त्यामुळे प्रकृतिअस्वास्थ्य ही समृद्ध वर्गाची समस्या आहे. वाहनांच्या अनिर्बंध वापरामुळे प्रदूषण वाढते- परिणामी आजार येतात. वैद्यकीय उपचारांचा खर्च अतोनात वाढल्याने गरीबांचे संसार हलाखीचे होतात. सरकारने आरोग्यविषयक मदतीच्या कितीही योजना आखल्या तरी त्या गरजूंपर्यंत पोचत नाहीत. त्यांचे आजार त्या अटींत बसतातच असे नाही. अशा अनेक अडचणी समाजासमोर आहेत ही वस्तुस्थिती आहे.
पहिली पायरी
अशा दारुण परिस्थितीत योग आपल्याला आधार ठरू शकतो. योगाची ध्यान, समाधी ही खूप पुढची पायरी सर्वजण गाठू शकत नसले तरी त्यांचे साधन असलेली योगासने, प्राणायाम आपल्याला मदतीचा हात देऊ शकतात. योगासनांचा विचार केला तर त्यासाठी खर्चिक साधनांची आवश्यकता नसते. योगामॅटवगैरे आता प्रचलित झाल्या असल्या तरी त्यासाठी साधी सतरंजी- ती नसल्यास एखादी चादरही चालते. माणसाच्या उंचीइतकी जागा पुरेशी होते.
होय ! इथे गुरू उपयोगी पडतो !
गुरूच्या मार्गदर्शनाखाली आसने शिकता येतात. चिकाटी मात्र पाहिजे. कोणतीही क्रिया २१ दिवस सतत केली की तिची सवय होते असे म्हणतात. चिकाटी मात्र पाहिजे. त्यामुळे सातत्याने योगासने केली की आपले शरीर हळुहळू वळू लागते. नियमितपणे योगासने केल्याने स्नायू मजबूत होतात, तसेच त्यांची लवचिकताही वाढते. त्यामुळे काम करण्याची क्षमताही वाढते. काम केल्याने काहींना पैसा मिळेल, तर काहींना समाधान मिळेल. आपल्या माणसांसाठी काम केल्याने नातीही दृढ होतात. आनंद काही फक्त व्हिडिओ पाहून किंवा खरेदी, बडेजाव यातूनच मिळतो असे नाही. समाधान ही आनंदाची पहिली पायरी आहे. आनंदामुळे शरीरात हॅपी हर्मोन्स म्हणजे आनंददायी स्त्रावांची निर्मिती होते. त्यामुळे नैराश्य टळू शकते. मनोकायिक आजारांना अटकाव होऊ शकतो.
आसनांचे प्रकार
योगासने उभे राहून, बसून तसेच पोटावर आणि पाठीवर जाऊन चारही प्रकारे करतात. उभ्याच्या आसनांतील ताडासनाने पोट आत खेचले जाते. पाठीच्या कण्याला ताण पडून शरीर हलके होते. पोटऱ्या, मांड्यांना बळकटी येते. वृक्षासनानेही पाय, मांड्या मजबूत होतात. पायांना शरीराचा तोल सांभाळण्याची सवय होते. अर्धकटिचक्रासनाने कमरेची चरबी कमी होते. पाठीचा कणा लवचिक होतो. अर्धचक्रासन, पादहस्तासनामुळेही पाठीच्या कण्याला बळकटी येते. त्रिकोणासनामुळे कमरेवरील चरबी कमी होते. मधुमेह, श्वसनविकारांवरही हे आसन उपयुक्त ठरते.
बसून करण्याच्या आसनांमध्ये पश्चिमोत्तासनात पायाचे अंगठे धरून डोके पायावर टेकवायचे असते. त्यामुळे पाठीचा कणा, पोट यांना ताण बसतो. पचनाच्या तक्रारी कमी होतात. लहान मुलांची उंची वाढण्यासाठी ते उपयोगी आहे. वक्रासन, अर्धमत्स्येंद्रासनामुळे पाठीच्या कण्याला पीळ बसून पाठदुखीवर उपाय होतो. यकृत, स्वादुपिंड यांना मर्दन होते. जेवल्यावर वज्रासन केल्याने अन्न पचन चांगले होते.
पाठीवर झोपून करण्याच्या आसनांत सर्वांगासन सर्वोत्कृष्ट समजले जाते. यात शीर्षासनाचे फायदे मिळतात, पण त्यातील धोके कमी होतात. यामुळे श्वसनाचे विकार होत नाहीत. मेंदूला चांगला रक्तपुरवठा होतो. पवनमुक्तासनामुळे बद्धकोष्ठता नाहीशी होते. वातविकारावर हे आसन उपयुक्त आहे. पोटावरच्या आसनांमध्ये भुजंगासनात पाठीचा कणा मजबूत होतो. धनुरासनाने पोटावरची, मांड्यांवरची चरबी कमी होते.
सूर्यनमस्कारात सर्वांगाला व्यायाम होतो. सूर्यनमस्कार हे सर्व आसनांचा राजा समजले जातात.
प्राणायाम
प्राणायामामुळे प्राणवायूचा पुरवठा शरीरात व्यवस्थित होतो. भस्रिका व नाडीशुद्धीमुळे शरीरातील अशुद्ध द्रव्ये बाहेर टाकली जातात. उज्जायी हा थायरॉइडच्या विकारावर उपाय ठरू शकतो. शीतली, शीतकारी , सदंता यामुळे शरीराला थंडावा येतो. भ्रामरीमुळे मेंदू शांत होतो.
आसने, प्राणायाम यामुळे योगोपचार होतो हे आधुनिक वैद्यकशास्त्रानेही स्वीकारले आहे. करोनाकाळात विविध इस्पितळांत डॉक्टरांनी रुग्णांना याबाबत मार्गदर्शन केले आहे.
शरीर व मन या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. शरीराचे स्वास्थ्य मनावर आणि मनाचे स्वास्थ्य शरीरावर अवलंबून असते. नाण्याच्या या दोनही बाजू खणखणीत असतील तर जीवन सफल, संपूर्ण होऊ शकते. योगासने, प्राणायामानंतर प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी यांची वाट धरता येते. त्यामुळे योगविद्या हाच उज्ज्वल भविष्याचा महामार्ग ठरतो. तो स्वीकारायचा की नाही हे मात्र आपण ठरवायला हवे. ज्यांनी तो स्वीकारला आहे, त्यांनी त्या मार्गावरची वाटचाल पुढे चालू ठेवावी. प्रयत्नांची पहिली पायरी म्हणून योगासने, प्राणायाम करायला लागू या का?