sitename_image

मानस-मंथन

सोला(र)पूरच्या आधुनिक भगीरथाची वॉटरबॅंक

‘यावेळी दुष्काळ पडता पडता वाचला. पण सध्याप्रमाणेच पाण्याचं अनर्थकारी नियोजन होत राहिलं तर पाण्याचा प्रश्न अधिकच बिकट होत जाईल. पुढची युद्धं ही पाण्यासाठी होतील. हेच आम्ही दोघं अंकोलीच्या माळरानावरून जगाला ओरडून सांगत आहोत, की वेळीच डोळे उघडा. ‘

“आपल्याकडे भरपूर सूर्यप्रकाश आहे. पुरेसा पाऊस आहे. या बळावर चांगलं आयुष्य येथेही जगता येऊ शकतं, हे आम्हाला दाखवून द्यायचं आहे. आमच्या एकत्र कुटुंबाच्या जमीनीवर आम्ही वॉटरबॅंक सुरू केली आहे. अशा २५ साठ्यांचा पालट प्रॉजेक्ट सुरू होणार आहे. “ अरुण देशपांडे यांनी माहिती दिली. यंदा पावसानं चांगलाच हात दाखवला. जवळजवळ निम्मा पावसाळी होत आला तरी पावसाचा पत्ता नवह्ता. अशा वेळी या प्रकल्पामुळे परिसर हिरवा राहिला. त्यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल एस. सी. जमीर यांनी या प्रकल्पाला भेट दिली. सगळीकडे पाण्याचे दुर्भिक्ष्य असताना येथे भरपूर पाणी होतं. जरूर लागली तर जनावरांसाठी छावणी येथे सुरू करायची तयारी देशपांडे यांनी सुरू केली हेती. सोलापूरचे जिल्हाधिकारी जगदीश पाटील यांनी या संबंधा हालचाली सुरूही केल्या होत्या. सुदैवानं नंतर पाऊस पडला, त्यामुळे छावणी चालवण्याची वेळ आली नाही. दुष्काळाची पाहणी करण्याचा राज्यपालांचा हेतू होता. इथे येऊन त्यांनी प्रकल्प पाहिला. त्यामागची कल्पना समजावून घेतली. त्यामुळे या प्रकल्पाला चालना मिळाली.

अंकोली येथील हा प्रकल्प महात्मा गांधी व डॉ.जे.सी कुमारप्पा यांच्या विचारांनी भरलेल्या एका स्वप्नाळू शास्त्रज्ञानं तळमळीनं केलेला भगीरथ प्रयत्न आहे. या प्रकल्पाला आणि त्यामागच्या संकल्पनेला अमेरिकेतल्या काही विद्यापीठांत व काही बैठकांतही मान्यता मिळालेली आहे. “आपल्याकडे कुणी काही सांगिलं तर त्यावर कोणी विश्वास ठेवत नाही.पण परदेशात त्याला मान्यता मिळाली की येथे लोकांना त्याचं महत्त्व पटतं. परदेशस्थ भारतीयांनी शिफारस केल्यामुळे दिल्लीत साउथ ब्लॉकमध्ये उपपंतप्रधान, कृषिमंत्री, ग्रामीण विकास मंत्री सचिव यांच्यायसमोर पाण्याच्या ऑडिट संबंधातमाहिती दिल्यावर त्यांनी सचिव दर्जाचे अधिकारी, बॅंकांच्या अधिकाऱ्यांना दुष्काळाची पाहणी करण्यासाठी पाठवलं. तेव्हा कुठे आमच्या २० वर्षांच्या अभ्यासावर त्यांचा विश्वास बसला.” अरुणजींनी सांगितलं.महाराष्ट्र ज्ञानमंडळानं त्यावर मूलभूत कृषिसाक्षरता व जलसाक्षरता या दोन सीडी काढल्या आहेत.

अरुण देशपांडे स्वतः कृषि अभियांत्रिकीत पदवीधर व शास्त्रज्ञ आहेत. त्यांचे वडील कै. रंगनाथ देशपांडे हीही कृषिशास्त्रज्ञ होते. औपचारिक शिक्षणानंतर दोन वर्षे त्यांनी एका बहुराष्ट्रीय कंपनीत खत विक्री व्यवस्थापन केले. किर्लोस्कर कन्सल्टंटसाठी ट्रॅक्टर व नांगराच्या संबंधा त्यांनी पाहण्या केल्या. पुण्याजवळील तीनशे लघुउद्योगांच्या पाहणीत सहभाग घेतला. बांगला देशाच्या स्वांत्र्य संग्रामानंतर भारतात प्रचंड प्रमाणात आलेल्या बांगला देशी निर्वासितांच्या पुनर्वसनाच्या दंडकारण्य प्रकल्पावर काम केले. लोकविज्ञान संघटना व विज्ञान चळवळीचे ते पूर्णवेळ कार्यकर्ते झाले. ते गांधीवादी बाबा आमटे व अण्मासाहेब सहस्रबुद्धे यांच्या संपर्कात आले. आमटे यांच्या सोमनाथ प्रकल्पावर अरुणजी व त्यांच्या पत्नी सुमंगला यांनी चार वर्षे काम केले. महारोग्यांनी न खचता दोन हजार एकरांवर काम केले पाहिले आणि त्यांना वाटले, आपण कुठेही गेलो तरी ताठ उभे राहू शकू. ऑल इंडिया पीपल्स सायन्स मूवमेंट उभी राहिली. आमच्यापुढे दोन रस्ते होते. एक नक्षलवादाचा , दुसरा गांधीवादाचा.

नक्षलवादाचा रस्ता हींसेकडे जाणारा होता. गांधीजींचा शांतेवर विश्वास होता. तेव्हा जाणलं, गांधीजीच आपल्याला वाचवू शकतात.हा विचार करू अरुणजी व सुमंगलाताई अंकोलीला आले. तेथे प्रयोगपरिवाराचे काम त्यांनी सुरू केले. त्यांनी विविध ठिकाणी केलेले काम, घेतलेला अनुभव यातून ते शिकत गेले. त्याची परिणती आता या पाणी साठविण्याच्या प्रकल्पात झाली आहे. राज्यपालांच्या फेरीआधी त्यांच्यापुढे संगणकावर प्रेझेंटेशन करण्याचे काम सुमंगलाताईंनी केले. मृदुभाषी परंतु ठाम अशा त्यांच्या भाषणाने राज्पालही प्रभावित झाले आणि हा प्रकल्प पाहावा असे त्यांनी ठरवले.

सुमंगलाताई स्वतः बी.एस.सी. बी.एड. आहेत. त्यांना गांधी फाउंडेशनची शिष्यवृत्ती मिळाली आहे. त्यांनी जैविक खतांवर प्रयोग केले. लोणारी कोळसा करणाऱ्या आदिवासींसाठी शाळा सुरू केली. लोकविज्ञान चळवळीत पूर्णवेळ कार्यकर्ती म्हणून काम केले. शिक्षण मुंबईत होऊनही मातीत हात घालावयाला ही बाई तयार झाली हे विशेष.त्यांनी आरोग्य शिक्षणावर पुस्तिका तयार केल्या आहेत. सोलापुरातील हरिभाई देवकरण प्रशालेत विज्ञान शिक्षिका म्हणून अनेक वर्षे त्यांनी काम केले. विज्ञानसहली, विज्ञान प्रदर्शने, विज्ञानवक्तृत्वस्पर्धा यांच्या माध्यमातून सोलापुरात विज्ञानचळवळ चालवली. "भारत जनविज्ञान जत्था"चा पुरस्कार त्यांना मिळाला आहे.

अंकोलीला आल्यावर देशपांडे दांपत्यानं जलसंधारणाच्या प्रचिलित पद्धती वापरून आपल्या कुटुंबाच्या एकत्र जमिनीवर बनशेती वाढवली. पावसाचा थेंबन् थेंब अडवली. अडीच कि.मी. लांबीची उपसा जलसिंचन योजना करून पाणी आणले. त्यामुळे त्यांच्या दोन व खालच्या अंगाला असणाऱ्या सात विहिरींचे पाणी वाढले. पण तो तात्पुरता फायदा झाला. नंतर पाण्याअभावी नवशेती जळली. १५ खिलारी जनावरे छावणीत नेऊन बांधावी लागली. पिण्याचे पाणीही मिळेना, त्यावरून त्यांना जाणवले, पाण्याचा उपसा प्रचंड आहे.

जमीनीच्या पोटातील पाणी अनिर्बंधपणे उपसले जात आहे. जे पाणी साठण्यासाठी साठ वर्षे लागतात, तेवढे आम्ही एकाच वर्षात उपसत होतो. यावरून अरुणजींनी पाण्याचे ऑडिट मांडले. जीवनाचे केंद्र असलेले पाणी , त्याचे मह्व जाणून स्पष्ट केले की या सर्व प्रश्नांचे उत्तर पाणी वापराच्या अ(न)र्थशास्त्रात आहे.

आपण राहतो ते घर बांधण्यासाठी किती पाणी लागते त्याचे गणित ते मांडतात. घरासाठी विटा लागतात. त्या तयार करण्यासाठी एखाद्या शेतातील सुपीक मातीचा नाश होतो. एका विटेला लागणारी माती किमान २० लिटर पाणी धरून ठेवू शकते. ती विटेसाठी वापरल्याने मातीची जलसंधारणशक्ती कमी होते. सिमेंट, वाळू, लोखंड हे दूरवरून येते. त्यातील एक ट्रक वाळू नदीच्या पात्रातून गेली म्हणजे ५० हजार लिटर पाणी धरून ठेवण्याची क्षमता नष्ट करते. घरबांधणीसाठीही प्रचंड प्रमाणात पाणी लागते. ते काही ठिकाणी शे दीडशे कि.मी. वरून आणले जाते. म्हणजे हे सर्व गणित लक्षात घेता एक घर बांधण्यासाठी प्रचंड ऊर्जा लागते. एक कि.मी., एक मजला असा त्याचा हिशोब अरुणजी सांगतात. यावर उपाय काय? तर असे घर न बांधता रुरबन पद्धतीने घर बांधायचे. त्या परिसरात मिळणाऱ्या साधनसामुग्रीचा वापर करून घर बांधायचे. वॉटरबॅंक प्रकल्पात तळे खोदण्यातून जी माती, मुरूम हाती येतात, त्याने घर बांधले जाते. शक्यतोवर आपल्या घराच्या परिसरात उगवलेल्या झाडाच्या लाकडांचा उपयोग घराच्या खिडक्या, दारे तयार करण्यासाठी केला जातो. अकोलीत साकारत असलेले विज्ञानग्राम अशाच पद्दतीने आकार घेत आहे. ५० एकर म्हणजे २० लाख चौ. फूट जागेवर चार लाख चौ. फूट बांधकाम होणार आहे. त्यासाठी लागणारे ९५ टक्के बांधकाम साहित्य त्या ५० एकरातीलच असेल. शुद्ध हवेपासून अत्याधुनिक शिक्षण, तंत्रज्ञान, करमणूक, अन्न, वस्त्र, निवारा या सर्व गरजा येथे भागवता येऊ सकतील असा त्यांना विश्वास आहे. “एक कि.मी. वरून आणून भागवलेल्या गरजा म्हणजे एक मजला असा हिशोब केला तर आपण शंभराव्या मजल्यावर राहातो. आमच्यासारखे तळमजल्यावर राहायला या.”असे अरुणजींचे आवाहन आहे.

पाण्याचे ऑडिट

शेतमालाच्या आजच्या भावाबद्दल आपण अनेकदा म्हणतो, भाव किती वाढले आहेत. पण १९७० साल प्रमाण धरून विचार करा, त्यावेळी शेतमाल विकून शेतकऱ्याला त्याच्या बदल्यात सोनं, डिझेल, सिमेंट, वगैरे जेवढा माल मिळ होता, त्याच्या बदल्यात आज फार कमी मिळतो. आज सहा माणसांच्या शेतकरी कुटुंबाला आपल्या दैनंदिन गरजा भागवण्यासाटी दोन हजार रुपये लागत असले तर या वस्तू मिळवण्यासाठी १९७० साली जेवढे पाणी लागत होते, त्याच्या काही पट आज लागते. जवळजवळ २५ ते ६० पट आज लागते. म्हणजे शेतकरी शेतमाल विकून एक रुपया मिळवतो, किंवा खर्च करतो, तेव्हा शेतातून बाजार पेठेपकडे एक घनमीटर पाणी वाहून गेलेल असते. शहराकडे जाणाऱ्या गाड्या हे वाहणं वाढवतात. शेतमालाची निर्यात म्हणूनच फार अन्यायकारक आहे असे त्यांचे म्हणणे आहे. त्यांनी मांडलेले पाण्याचे ऑडिट असे आहे-एक किलोग्रॅम वजनाचा ऊस शेताबाहेर जातो तेव्हा पाचशे लिटर पाणी शेताबाहेर जाते. आपण एक कि.ग्रॅम साखर खातो तेव्हा ४ हजार लिटर पाणी पितो म्हणा ना ! अनावश्यक वाहतूक, विकासाच्या नावाखाली वृक्षतोड, पाणी प्रश्न सोडविण्यासाठी बांधलेली मोठी धरणे, तेथून पाणी पुरवण्यासाठी केलेला अनावश्यक वाज खर्च आपल्या या प्रकल्पामुळे वाचणार आहे, याबद्दल अरुणजी समाधानी आहेत.

दुष्काळ हा सोलापूर व इतर काही जिल्ह्यांच्या पाचवीलाच पुजलेला आहे. यावर अरुणजी म्हणतात, हा दुष्काळ मानवनिर्मित आहे. दुष्काळ पडणं हे काही जणांना सोयीचं असतं. पोट भरण्यासाठी गेल्या पाच वर्षांत सोलापूर जिल्ह्यातून ३ लाख लोक पुण्यामुंबईकडे गेले आहेत. येथे रोजगार नाही म्हणून पदवीधर तरुण तिकडे गेले ते वेगळेच. पोट भरायला गेलेले हे लोक तेथे असंघटित क्षेत्रात कामं करतात. तेथे काम करणारे शकडा ८५ कामगार दुष्काळी भागातून आलेले असतात. ही माणसे शहरात जातात, तेव्हा तेथे झोडपट्टीत निवारा शोधतात. लहान जागा,गलिच्छ वस्ती, कोंदट हवा असली तरी त्यांना तेथे झोपडपट्टीत निवारा शोधतात. लहान जागा, गलिच्छ वस्ती, कोंदट हवा असली तरी त्यांना तेथे रोजगार मिळतो. धट्टाकट्टा हमाल दिवसाला तीनचारशे रुपये मिळवू शकतो. बाया घरगुती कामं करतात किंवा कचरा गोळा करततात. त्यातही महिना दोनतीन हजार रुपये मिळवतात. पण हे फार दिवस चालत नाही. तरुणांची शक्ती चारसहा वर्षांत कमी होते. मग मजुरी कमी मिळते. खेड्यात आजारी माणसे आणि म्हातारे राहतात. त्यांचं जीवन शहरातून येणाऱ्या मनीऑर्डरीवर इवलंबून असतं. बऱ्याचदा स्त्रिया खेड्यात राहतात. तेथे त्यांना पाणी, चारा, सरपण मिळवण्यासाटी श्रम व वेळ प्रचंड प्रमाणात खर्च करावे लागतात. आमचा हा प्रकल्प बघणाऱ्या स्त्रिया म्हणूनच तेथे घरात नळ सोडून येणारे पाणी बघून फार खूष होतात.

प्रकल्प स्वदेस

प्रकल्प स्वदेसच्या कल्पना विलास वॉटरबॅंक प्रकल्पाला ३५ लाख रु. खर्च आला आहे. १ लाख चौ. फूट पृष्ठभाग, २६ फूट खोली, पाचशे मीटर घेर असलेले हे तळे खोदायला २८ दिवस लागले. चार वर्षांपूर्वी पाऊस चांगला झाला. तळे जानेवारीमध्ये खोदले. जुलैमध्ये ते भरले. तळ्यातले पाणी जमीनीमध्ये जिरून जाऊ नये म्हणून पाच मोठे प्लास्टिकचे तुकडे आणून त्यांचे वेल्डिंग केले आहे. ते प्लास्टिक या तळ्याच्या तळात अंथरले आहे. बांधावर काळ्या मातीचा गाभा व मुरुम वापरला आहे. तो इतका टणक आहे, की त्यात एखादा खिळाही जाऊ शकत नाही. तळे खोदून मिळालेली माती व मुरुम प्रचंड असतो. या तळ्यातून निघालेल्या २५ हजार घ. मी. मातीचा वापर करून डोम पद्धतीची घरे बांधाच्या लगत (किंवा बांधामध्येच, आपपण वाळूत खोपी करतो तशी बांधण्यात आली आहेत. ती माती वापरली गेली आणि या घरांमुळे बांधाची उंचीही वाढली आहे. ही घरे भूकंपरोधक आहेत ही आणखी एक जमेची बाजू.बांगला देशातील नोबेल पुरस्कार विजेते महंमद युनूस यांचा वारसा मी पुढे नेत आहे असे अरुणजी म्हणतात.

इथे आमच्या एकत्र कुटुंबाची जमीन वापरली आहे.पण बचगटाच्या माध्यमातून असे प्रकल्प उभे राहू शकतात ; नव्हे, आज त्यांची निकड आहे. एकूण उत्पादक कष्टाच्या ८५ टक्के कष्ट स्त्रियाच करतात. पण त्यांची जमीनीवरील मालकी फक्त २ टक्के आहे. त्यांना या कष्टाबद्दल काहीच मोबदला मिळत नाही. उलट उपेक्षा आणि छळच सहन करावा लागतो. खरं तर बचतीची स्वयंप्रेरणाच स्त्रीमध्ये आहे. जन्माला आलेल्या प्रत्येक स्त्रीला एक हजार घ.मी. पाणी वर्षाला मिळावे, त्यावर तिचा हक्क असावा अशी आमची मागणी आहे. बचतगटातील सभासद स्त्रियांना रेशनकार्डावर हे पाणी मिळावं. बचतगटातील सभासदांना प्रत्येकी १० गुंठे जमीन व त्यावर डोम पद्धतीचे घर इथे असावे. घरबसल्या परसबाग करून आपल्यापुरती जनावरे पाळून त्या कुटुंबाचा निर्वाह करू शकतील. त्यासाठी त्यांच्या हक्काचं पाणी त्यांना मिळेल . हे तळं उंचावर असल्यानं तेथून नळ थेट त्यांच्या घरात येईल. शेत जवळ असल्यानं येण्याजाण्याचे कष्ट वाचतील. त्यांना नेहमीच वाटतं, आपली माणसं शहरातून आपल्याकडे परत यावीत, ते त्यांचं स्वप्न साकार होईल.

यासाठी जमीन हवी, ती कुठून मिळणार या माझ्या प्रश्नावर त्यांचं उत्तर होतं, सरकारनं १० एकर पडीक जमीन बचतगटांच्या नावानं द्यावी. त्यावर १ हेक्टरचं खोल तळं रोजगार हमी योजनेतून करून द्यावं. स्त्रियांनी आजवर केलेल्या कष्टांचा तो मोबदला असेल. या बॅंकेत पावसाचे पाणी साठवता येईलच, त्याशिवाय पाटाच्या वाया जाणाऱ्या पाण्याच्या फक्त ५ टक्के सरकारनं या जमीनीत घातलं तरी ते पुरेसे होईल. या बॅंकेत आसपासच्या पाण्याची ठेव ठेवता येईल, जेणेकरून त्या स्त्रीच्या डोक्यावर पुन्हा पाण्याचा हंडा, मोळी वा चाऱ्याचा भारा येणार नाही. ती राहते तेथे ती झाडं लावील. जीवनाधार बागा जोपासेल. १० गुंठे जागा तिच्या मालकीची असेल,त्यात घर, कमी खर्चातील हरितगृह तिला करता येईल. त्यामुळे नेहमीच्या सहापट उत्पन्न मिळेल. ते दीड एकर बागायत जमीनीच्या उत्पन्नाएवढं असेल. चुलीतील राख, माणसे- जनावरांची विष्ठा यातून खताचा कारखानाच तयार होईल. त्यामुळे उत्पादकता वाढेल. पाणी, चारा, सरपण यांकरिता तिला करावे लागणारे श्रम व वेळ वाटेल. तो ती गृहउद्योगासाठी वापरू शकेल. आपण आपल्या गरजा सीमित ठेवल्या, तर आपण त्या या प्रकल्पाच्या माध्यमातून भागवू शकतो. त्यासाठी शहराकडे जाण्याची व निकृष्ठ आयुष्य जगण्याची आवश्यकता राहणार नाही.

आपल्याकडे दाट लोकसंख्या आहे म्हणून प्रश्न गंभीर आहेत असं म्हटलं जातं, पण सोलापूर जिल्ह्यातील लोकसंख्येचा विचार करता फ्रान्स व जर्मनीहून ती जास्त नाही. सुसंस्कृतपण केलेले फोटोसिंथेसिस म्हणजे शेती. आपल्याकडे भरपूर सूर्यप्रकाश आहे. पुरेसा पाऊस आहे. पाणी पुरेसे नाही हा बकवास आहे. पुरेसं पाणी, हो , पुरेसं पाणी. एक सें.मी. पाऊस एका हेक्टरवर पडला, तर १० हजार लिटर म्हणजे १ टॅंकर पाणी होतं. सोलापूर जिल्ह्यात सरासरी पाचशे मि.मी. पाऊस पडतो. म्हणजे ५० सें.मी. ते पाणी या तळ्यात साठवलं तर पाणी कमी पडणार नाही. जगण्यासाटी इतकं पाणी कमी पडत नाही. आमच्या या प्रकल्पातलं पाणी विकत घ्यायला गेलं तर २ कोटी रु. लागतील. त्यामुळे हे पाणी शेतीसाठी वापरणं परवडणारं नाही. कौटुंबिक बागा, पशुपालन यातून अन्न, वस्त्र, निवारा या गरजा भागू शकतात. या प्रकल्पाजवळ ५ लाखात एक फार्महाऊस होऊ शकतं. तेवढ्या पैसात शहरात उदरनिर्वाहासकट निवारा शक्य नाही. तलावात काश्मीरप्रमाणे तरंगत्या बागा, मत्स्यशेती होऊ शकते. शहतात जाऊन निकृष्ठ जीवन जगणाऱ्यांना माझं आवाहन आहे की त्यांनी गावाकडे परत यावं. पाण्याचं योग्य नियोजन करणारेच यशस्वी होतात. त्यामुळेच बुद्ध धर्माचा प्रसार झाला. सोलापुरात सिद्धेश्वरांनी असंच पाण्याचं नियोजन केलं. मी मलिकंबरच्या जलव्यवस्थापन घराण्यातील आहे. पूर्वी भारतात बरेच तलाव होते. ते बुजवण्यामुळे पर्यावरणाची हानी होत आहे. गंगेच्या उपनद्या मानवानं वळवल्या. पण त्या नवीन जमीन सुपीक करत जातात. धरणांमुले आपण उलटी प्रक्रिया करतो. वीज निर्मितीसाठी धरणं आवश्यक मानली जातात, पण देशपांडे यांच्या मते वीज हवीच कशाला? बैलाची पैदास व वापर ही आपली परंपरा आहे. खिलारी बैल पाण्याची मोट ओढण्यापासून कपडे धुण्यासाठी लागणारी ऊर्जाही पुरवू शकतात. शिवणयंत्राच्या पायट्यावर लॅपटॉप चालू शकतो. एक बोकड गोल गोल फिरवला तर त्यावर दोन संगणक चालू शकतात. सौर ऊर्जेवर पाणी तापवणे, पंखा फिरवणे ही कामं होऊ शकात. म्हणून त्यांनी महाराष्ट्र राज्य वीज मंडळाच्या कार्यकारी अभियंत्यांनी बोलावून आमची वीज बंद करून टाका असं सांगूनही टाकलं आहे.

अरुणजी म्हणतात ते रूरबन म्हणजे काय?

सूर्यशक्तीचा जास्तीतजास्त उपयोग करून येथे प्रकाशसंश्लेषणातून त्यांना सदाहरित पट्टा तयार करायचा आहे. त्यामुळे सोला(र)पूर हे नाव सार्थ होणार आहे. येथे शहरी व ग्रामीण जीवनपद्धतीतील उणिवा नाहीशा करून दोन्ही जीवनपद्धतींतील फायदे अपेक्षित आहेत. शहरातील स्वातंत्र्य येथे असेल; पण गावगाड्यातील जातिव्यवस्था नसेल. माणसाच्या सर्व जीवनावश्यक गरजा भागविण्याची शक्ती या जीवनपद्धतीत आहे. वनस्पतींबरोबरच प्राणी हा येथील जीवनपद्धतीचा अविभाज्य भाग असेल. येथे होणाऱ्या उत्पन्नाच्या ७५ टक्के भाग येथील रहिवाश्यांसाठी असेल. उरलेल्या २५ टक्के भागात वजनाने हलक्या उत्पादन व सेवांची निर्यात होईल. येथे ऋषी व कृषी संस्कृती बहरेल. ज्ञानातून मिळणारा आनंद सर्वोच्च असतो. म्हणून ज्ञानाची कवाडं सर्वांना, कमी श्रमात, कमी खर्चा व घराजवळ उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न येथे सुरू झाले आहेत.

शहराची ओढ असण्याचे कारण म्हणजे तेथे उपलब्ध होणारे शिक्षण. पण येथे शहरातील सर्वोत्तम विद्यालयांच्या शाखा असतील. मुलांबरोबर त्यांच्या आयाही इथे शिकू शकतील. संगणकाद्वारे प्रशिक्षण हे या शिक्षणाचे सूत्र असणार आहे. ई गुरुकुल अशा पद्दतीच्या शिक्षणात मुलाला हेवे ते शिक्षण घेता येईल. हवी तेव्हा परीक्षा देता येईल. एका विषयात एका इयत्तेत, दुसऱ्या विषयात दुसऱ्या इयत्तेत असेही होऊ शकेल. प्रत्यक्ष शाळेत आठवड्यातील एखादा दिवस गेलं तरी पुरेल. मग त्यासाठी थोडं लांब जावं लागलं तरी चालेल. संगणकाद्वारे शिक्षण असल्यावर शिक्षण सोपं झालं नाही तर काय? अशक्य वाटतं? आज ज्याच्या त्याच्या हाती मोबाईल फोन दिसतो तो तसा दिसेल हे आपल्याला काही वर्षांपूर्वी वाटलं होतं का?

अंकोलीत उभ्या राहात असलेल्या विज्ञानग्रामात परिसर अभ्यासाची यंत्रणा उभी राहात आहे. महाराष्ट्र ज्ञान मंडळाची एक शाळा येथे आकार घेत आहे. हे विद्यापीठ सुरू होईल तेव्हा तज्ज्ञांचं प्रशिक्षण तिथे होईल. जागतिक पातळीवरील पदव्युत्तर शिक्षण तिथे होईल.दीड लाख लोकांना विज्ञान व तंत्रज्ञान प्रसाराचं प्रशिक्षण तिथे दिलं जाईल. तेही संगणकाद्वारे. त्यामुळे वर्षभरातून आठदहा दिवसच येथे आलं तरी चालेल. राज्यात पंधराशे पाणलोट क्षेत्रं आहेत. तेथे तिवढीच विज्ञान-ग्रामं उभी राहावीत असा प्रयत्न असणार आहे. विज्ञानग्रामातील विज्ञान व ज्ञान प्रशिक्षणात सुमंगलाताईंचा मोलाचा वाटा आहे. महाराष्ट्र ज्ञानविज्ञान महामंडळाच्या शिक्षण चळवळीत पुस्तकं आणि अभ्यासक्रम तयार करण्याचे काम त्या करत आहेत.

अंकोलीच्या माळरानावर उभ्या राहात असलेल्या मानव उत्थानाच्या प्रयोगासाठी देशपांडे दांपत्य तन, धन, मनाने सक्रिय आहे. त्यांना लोकांच्या सहभागाची अपेक्षा आहे. “त्यासाठी कोणी पैसे उचलू देऊ नयेत. ते आम्हाला नको आहेत. वॉटरबॅंक प्रकल्पासाठी कोणी बचतगटांसाठी जामीन राहील का? तसे नसेल तर चळवळीला नुसते करमणूक मूल्य नाही. लोकांसाठी काही करायचे असेल तर आम्हाला मदत हवी आहे. पूर्वी बरेच लोक अंकोलीला वॉटर बॅंक पाहायला येत असत. पण हे सहलीला येण्याचं ठिकाण नाही. गंभीरपणे मदत करायची असेल त्यांचे स्वागत आहे असा अरुण व सुमंगला देशपांडे यांचा कळकळीचा निरोप आहे.

(पूर्व प्रसिद्धी- सर्वोत्तम दिवाळी अंक २००९)

#मुलाखत