sitename_image

मानस-मंथन

मंथन श्रुतिका १५ नोव्हे २५

मोहन- आज राम येतो की नाही कोण जाणे.
मीरा- अहो, असं काय करता? आज शनिवार नाही का? ते भाजी घ्यायला इकडे येतातच येतात.
राम- म्हणजे काय वहिनी, मी इकडे काय फक्त भाजी घ्यायलाच येतो का? तुम्हाला दोघांनाही भेटायचं असतं.
मीरा- हे आलेच पहा राम भावजी. मी काय म्हटलं होतं?
राम- मीरा वहिनी, तुम्ही म्हणालात तसा मी आलेलो आहे. आणि काय रे मोहन, मी आज येणार नाही असं का बरं वाटलं तुला?
मोहन- तसंही तू म्हणाला होतास, काकांकडची भाजी येणार आहे, त्यामुळे मी म्हटलं, आज तू –
राम- आज मी येणार नाही- असंच ना? पण काकांकडची मळ्यातली भाजी त्यांनी पाठवली, तरी मी इथे ठरल्याप्रमाणे हजर आहे. नेमेचि येतो राम जाण बाळा.
मीरा- हो, नेमेचि येतो मग पावसाळा असं म्हणतात, त्यानंही आपलं वेळापत्रक बदललं आहे, हे विसरलात का रामभावजी?
मोहन- पावसाळ्यानं आपलं वेळापत्रक बदललं आहे हे खरं आहे, पण थंडीनं मात्र त्या पावसाळ्याला नक्कीच वेसण घातली असं नाही का वाटत तुम्हाला?
राम- होय रे बाबा. गेल्या आठवड्यात पाऊस कधी येईल ते कळत नव्हतं, आणि आता पावसाला हद्दपार करून थंडीनं एकदम मुसंडीच मारली आहे की.
मीरा- हो नं. गेल्याच आठवड्यात पारा धाडकन खाली उतरला आणि छत्र्यांच्या जागी एकदम स्वेटरची आठवण यायला लागली.
'''मंथन- २'''
मोहन- आमचे जळगावचे काका आहेत नं, त्यांचा तर काकडतच फोन आला. म्हणाले, महाबळेश्वरपेक्षा इथं थंडी पडली आहे, आता बोला. पण काय रे, तुला बाहेर पडल्यावर थंडी नाही का जाणवली? तू चक्क शूरपणे हाफशर्ट घालून आला आहेस-
राम- मग? मी हल्ली सकाळी सकाळी पळायला जातो नं? बाहेर पडताना जरा गार वाटतं, नाही असं नाही, पण एकदा पाय चटाचटा उचलायला सुरुवात केली की मग थंडी कुठच्याकुठे पळून जाते. चला, कधी तुम्ही सुरुवात करताय?
मीरा- नाही राम भावजी. सध्या आम्ही सहकुटुंब सहपरिवार पक्षी पाहातोय. सकाळी सकाळी. राम भावजी, तुम्हाला सांगू का, इतकी मजा येते, सकाळी सौम्य रंगाचे कपडे घालायचे आणि –निघायचं.
राम- निघायचं, पण कुठे? आणि एवढे पक्षी दिसतात तरी कुठे तुम्हाला?
मोहन- अरे बाबा, थंडी पडली की हजारो स्थलांतरित पक्षी आपल्या सोलापूर जिल्ह्यात वस्तीला येतात की नाही? आता पुढच्या रविवारी आम्ही उजनी जलाशयाकडे जाणार आहोत. विशेषतः फ्लेमिंगो म्हणजे अग्निपंख पक्ष्यांसाठी हा जलाशय फार प्रसिद्ध आहे.
मीरा- फक्त अग्निपंखच नाही, तर सर्पगरूड, पेलिकन वगैरे तब्बल अडीचशे जातींच्या पक्ष्यांचे थवे या भागात येतात.
राम- बोरामणीच्या गवताळ सफारीतही खूप पक्षी असतात म्हणे.
मोहन- पक्षी सप्ताहानिमित्त पर्यावरण प्रेमींनी या सफारीलाही भेट दिली, तेव्हा आमचे चिरंजीव गेले होते. मोर, चांडोलासारखे पक्षी आणि काळवीट, नीलगायीसारखे प्राणीही त्यांना तिथे दिसले.
'''मंथन-३'''
मीरा- आमच्या रोहितला पक्षीनिरीक्षणाचा छंदच लागला आहे. पक्षीनिरीक्षणाबरोबरच त्यांनी फुलपाखरंही पाहिली. राम भावजी, या फुलपाखरांच्या किती जाती असतील सांगा बरं.
राम- नाही बुवा माहिती.
मोहन- मलाही माहिती नव्हती. रोहितनं सांगितल्यावर कळलं, चक्क ७० प्रजातींची फुलपाखरं त्यांना दिसली. पतंग, कीटक, दिसले ते वेगळंच. खरंच, हे निसर्गाचं वैभव अनुभवावं ते या हिवाळ्यातच. फार लांब इतर कुठे नाही, खुद्द सोलापुरात सिद्धेश्वर वनविहारात तर आपण जाऊच शकतो.
मीरा- खरंच आपण आपल्या रोजच्या व्यापात इतके अडकलेले असतो की आपल्याभोवतीच्या निसर्गालाही आपण गृहीत धरायला लागतो. पण सोलापूरचे निसर्गप्रेमी लेखक मारुती चितमपल्ली यांनी त्यांचं सगळं आयुष्य निसर्गाच्या सान्निध्यात घालवलं. त्यामुळे ते किती समृद्ध झाले असतील!
राम- ते तर समृद्ध झाले, त्याचबरोबर त्यांच्या अभ्यासातून त्यांनी विविध निसर्गसंबंधातलं लेखन केलं, एवढंच नाही, तर दहा बारा वर्षं खपून त्यांनी एक प्राणी कोश तयार केला आहे आणि आता तो तयार होत आला आहे. तो लवकरच प्रकाशितही होईल.
मोहन- निसर्गाचा विचार केला की जाणवतं, किती प्रकारचे वृक्ष आहेत, किती प्रकारचे डोंगर – पर्वत आहेत , किती प्रकारचे प्राणी आहेत—
मीरा- आणि किती प्रकारच्या स्पर्धा आहेत! ग्रामीण भारताला जवळची वाटणारी शंकरपट स्पर्धा हिंगोली जिल्ह्यातल्या साईनाथ कऱ्हाळे यांच्या सर्जा या बैलानं जिंकली. वाऱ्याच्या वेगानं तो या स्पर्धेत पळाला आणि पाचशेपेक्षा जास्त बैलजोड्यांपुढे सरस ठरला. या सर्जानं यापूर्वीही तीनवेळा हिंदकेसरी हा मान मिळवला आहे. त्यानं फॉर्चुनर गाडी आणि चांदीची गदा जिंकून दिली त्याच्या मालकाला.
'''मंथन-४'''
राम- ,स्पर्धांत महत्त्वाची ठरते ती जिद्द. प्रिसिजन गप्पांच्या वेळी कळलं, दहशतवादग्रस्त भागात काम करताना अधिक कदम यांना तब्बल १९ वेळा अतिरेक्यांनी उचलून नेलं, पण त्यांचं काश्मीरी मुलींना शिक्षणाला मदत करणं , त्यांचे विवाह करून देऊन त्यांच्या सुरळीत आयुष्याची मुहूर्तमेढ रोवणं चालूच आहे.
मोहन- त्यांना सुभाष रावजी शहा पुरस्कारानं सन्मानित केलं गेलं. बरोबर नं?
मीरा- हो. आणि सुमेधा चिंधडे यांना प्रिसिजन सामाजिक कृतज्ञता पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं.
राम- खरंच, सियाचीनसारख्या जगातील सर्वात उंच रणभूमीवर लढताना ऑक्सिजनची गरज असते हे जाणून तिथे त्यांनी ऑक्सिजन प्लान्ट उभारलं हे किती मोलाचं काम त्यांनी केलंय.
मीरा- शिवाय सैनिकांच्या विधवा पत्नी आणि मुलांसाठीही त्या अहोरात्र झटत असतात. म्हणून तर त्या या पुरस्काराच्या मानकरी ठरल्या.
मोहन- शिवाय सोलापूर आणि परिसरातल्या दहा विशेष कामं करणाऱ्यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.
मीरा- त्यामुळे खरं तर अशी कामं करणाऱ्यांना प्रोत्साहन मिळतं आणि इतरांना प्रेरणा मिळते.
राम- काय हो, तुम्ही शुक्रवारी आणि शनिवारी झालेल्या प्रिसिजन गप्पांच्या कार्यक्रमाला गेलात की नाही?
मीरा- मी गेले होते. गप्पांच्या पहिल्या दिवशी संकर्षण व्हाया स्पृहा हा कार्यक्रम होता नं. दोघंही कसलेले सादरकर्ते. अगदी तुम्ही आम्ही ज्या भाषेत बोलतो, त्या भाषेत त्यांनी कार्यक्रम सादर केला. अगदी पहिल्यांदा आपण दूरचित्रवाणीवर कसे गेलो आणि महेश मांजरेकर यांनी आपली स्वतःची ओळख वेगळ्या पद्धतीनं करून द्या
'''मंथन-५'''
म्हटल्यावर ‘वारशाने लाभले आहे, अभिनयाचे आकर्षण, या देहाचे नाव संकर्षण,’ अशी स्वतःची ओळख कशी करून दिली ते सांगितलं आणि प्रेक्षकांची मनं जिंकली.
मोहन- मलाही जायचं होतं, पण ऑफिसमध्ये उशीर झाला. आणि मग म्हटलं, बरं झालं, गेलो नाही, कारण कळलं, इतकी तुफान गर्दी होती, की मी थोडं उशीरा जाऊन उभं राहायलाही जागा मिळाली नसती.
राम- पण दुसऱ्या दिवशी तू गेला होतास मला वाटतं.
मोहन- हो. दुसरा शनिवारची सुट्टी होती. म्हणून लवकरच गेलो आणि जागा मिळवली. तोही कार्यक्रम चांगला रंगला. मूळ सोलापूरचे असलेले वैभव जोशी यांच्या कविता आणि मिस्किल टिप्पण्या, शरयू दाते या कसलेल्या तरुण गायिकेचं गायन आणि अमर ओक यांचे बासरी वादन यांनी मोठीच रंगत आणली खरी.
मीरा- त्यांनी सादर केलेला अपूर्वाई हा कार्यक्रम अमेरिकेच्या यशस्वी दौऱ्यानंतर भारतात सादर केला गेलेला पहिला कार्यक्रम होता हेही आम्हाला एक मोठंच आकर्षण होतं.
राम- असे कार्यक्रम आपण करतोय कारण आपल्याकडे शांतता आहे. पण दुर्दैवानं काही अतिरेक्यांना ते बघवत नाही-
मोहन- त्यामुळेच तर दिल्लीत भीषण बॉंबस्फोट घडवला त्यांनी. भर वस्तीत, लाल किल्ल्यासारख्या ऐतिहासिक वास्तूजवळ हा स्फोट झाला.
मीरा- हा आत्मघातली स्फोट होता म्हणे.
राम- हो नं. गाडी चालवणारा अतिरेकीही त्यात ठार झाला. त्यामुळे देशभर सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे नं.
'''मंथन-६'''
मोहन- पण आपला देश असा भेकड हल्ल्यांना घाबरणार नाही. भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी दिलेला शांततेचा संदेश आपण सर्वांनी स्वतःमध्ये रुजवला आहे. पसायदान मागणाऱ्या ज्ञानेश्वर महाराजांची परंपरा आपण जपली आहे.
वसुधैव कुटुंबकम् म्हणून आपण जगाला आपलंसं करण्याचा प्रयत्न करत आहोत.
मीरा- आणि म्हणूनच आपली प्रगतीची भरारी आपण सुरू ठेवूच. सत्तर पंचाहत्तर वर्षांपूर्वी आपल्याला किती इतरांवर अवलंबून राहावं लागत होतं, अगदी अन्नधान्यासाठीही. पण आता तसं नाही, अगदी वंदे भारतचा स्लीपर कोचही आपल्याकडे लातूरला तयार होतोय आणि तो सहा महिन्यांत रुळांवरून धावेल.
राम- भले आपल्याकडे काही कमतरता असतील, पण आपण त्यांच्यावर मात करतोय.
मोहन- भारतीय महिला संघानं यंदा विश्वचषक तर जिंकला, आता भारत श्रीलंका सामन्यात सोलापूरच्या गंगा कदम हिनं अंध महिला टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेत सामनावीर होण्याचा मान मिळवला आहे.
मीरा- भले शाब्बास.
मोहन- मीरा- पावसाळा संपला तरी थंडीमध्येही कांदा भजी छान वाटतात की नाही?
राम- म्हणजे तशी माझीही त्याला काही हरकत नाही.
मीरा- बघा हं राम भावजी. भजी खाऊन पळता येईल ना तुम्हाला? नाहीतर म्हणाल, मीरा वहिनींनी भजी खायला घातली त्यामुळे आळस आलाय—
राम- अजिबात नाही. उद्याही मी पळणार
मोहन- फक्त भज्यांनंतर चहा हवा म्हणजे ती छान पचतील-
मीरा- करते, करते. आधी भजी आणि मग चहा. चालेल?
राम- चालेल नाही, पळेल.
-------------------------------------------------------------------

#ताजे लेखन #श्रुतिका