मंथन श्रुतिका २९ नोव्हे २५
राम- (अरे ओ सांबा प्रमाणे हाक मारत येतो.) अरे ओ मोहनबाबू---
मोहन- मीरा, बघ गं कोण आलंय--
मीरा- अरेच्चा ! राम भावजी, तुम्ही-
राम- हो, आज शनिवार – म्हणजे दर वेळी तो घातवारच असतो किंवा न कर्त्याचा वारच असतो असं नाही वहिनी- तो मी येण्याचा वारही असतो. मीच- राम.
मोहन- राम, अरे अशी आरोळी ठोकून कसं ओळखणार मी आतून?
मीरा- हो नं आणि मी अगदी इथेच असले तरी तुमच्या आरोळीवरून कसं ओळखणार मी तुम्हाला?
राम- तर – तो आरोळी ठोकणारा मीच आहे. मीरा वहिनी, तुम्हाला तो शोले नावाचा चित्रपट आठवतो नं?
मीरा- आठवतो नं. शोले- त्यातलं कितने आदमी थे- हे वाक्य तर तेव्हा घराघरात, गल्लीगल्लीत ऐकू यायचं इतकं प्रसिद्ध झालं होतं.
राम- म्हणूनच त्यातल्या खलनायकासारखं हाका मारून तुम्हाला त्यातली वाक्यं अजूनही आठवताहेत का ते पाहात होतो.—
मोहन- म्हणून या आरोळ्या होय! त्यातली जय वीरूची जोडी खूपच गाजली. धर्मेंद्र आणि अमिताभ बच्चन.
मीरा- या दोघांनीही हिंदी चित्रपटसृष्टी गाजवली. धर्मेंद्र ही मॅन म्हणून गाजला, तर अमिताभ ॲंग्री यंग मॅन. परवा धर्मेंद्र यांच्या निधनानं हिंदी चित्रपटातला एक सदाबहार नायक अस्त पावला.
'''मंथन-२'''
राम- खरंय. पद्मभूषणनं त्यांचा गौरव झाला. उशीरा का होईना, त्यांना फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला. मराठी चित्रसष्टी आणि मराठी कलाकारांशीही त्यांचं जवळचं नातं होतं.
मोहन- त्यांचा शेवटचा चित्रपट पुढच्या महिन्यात प्रदर्शित होणार आहे. त्यात त्यांनी ब्रिगेडियरची भूमिका त्यांच्या ८९ व्या वर्षी साकारली आहे. तो त्यांना पाहायचा होता.
मीरा- शोलेचीही काही सीन कापलेली आवृत्ती आपण पाहिली होती. आता त्याच शोलेची सीन न कापलेली आवृत्तीही पडद्यावर दिसणार आहे-
राम- तीही त्यांना पडद्यावर पाहायला मिळणार नाही. पण आपण ती बघू तेव्हा आपल्याला धर्मेंद्र यांची कमाल पुन्हा एकदा अनुभवायला मिळेल. त्यांचे ३ शे चित्रपट प्रेक्षकांना नेहमीच आनंद देत राहातील.
मीरा- रामभावजी, तुम्ही येताना दिलेल्या आरोळीवरून शोले आजही प्रेक्षकांच्या मनात किती घर करून आहे, त्याची आठवण तब्बल ५० वर्षांनंतरही आहे, ते जाणवलं.
मोहन- हेच तर दुःखात सुख. पण राम, तुझ्यातला शोले फिवर उतरला की नाही?
राम- धर्मेंद्र गेल्याचं दुःख तर वाटलं, पण – मरण कोणाला चुकलंय हे ही जाणवतंच—
मीरा- खरंय. त्यावर काळ हेच औषध आहे.
मोहन- पण काही गोष्टी मात्र अजरामर असतात. रामायण काय, महाभारत काय, ही महाकाव्यं काळाच्या कसोटीवर घासून पाहिली तरी जाणवतं, ती अजरामर आहेत.
राम- कारण ती नुसती महाकाव्यं नाहीत, ते भारतीय संस्कृतीमधल्या नैतिकतेचं अधिष्ठान आहे.
मीरा- त्यामुळेच तर तब्बल पाचशे वर्षं झगडून, किती पिढ्यांनी संघर्ष करून रामजन्मभूमीवर साकारलेल्या मंदिराचं लोकांनी मनःपूर्वक स्वागत केलं. मंगळवारी मंदिराच्या बांधकामपूर्तीनंतर धर्मध्वज फडकला, त्याचं म्हणूनच फार महत्त्व आहे.
'''मंथन-३'''
मोहन- विकसित भारताचं स्वप्न पुर्ण करण्यासाठी प्रभू रामचंद्रांमधील सदाचरण, सत्य,संयम,सामर्थ्य आणि सद्भावना या गुणांचा अंगीकार करणं आवश्यक आहे असं पंतप्रधान मोदींनी हा धर्मध्वज फडकवताना म्हटलं आहे.
राम- म्हणून तर माझं नाव माझ्या आईवडिलांनी राम ठेवलं नाही का?
मीरा- अगदी बरोबर.
मोहन- हो रे बाबा, हो.
राम- ग. दि. माडगूळकरांचं गीतरामायण गेल्या शतकात आकाशवाणीनं जेव्हा प्रसारित केलं, तेव्हा ते ऐकण्यासाठी लोक अगदी आतुर असत. एवढंच नाही, तर आजही ते गीतरामायण गाऊन नवीन नवीन गायक मैफिली सजवत असतात.
मोहन- विशेष म्हणजे रामाचं चरित्र सांगण्यासाठी प्रत्येकाचं वेगळं माध्यम असू शकतं. रामायण मालिकेनं ते दूरदर्शनवर साकारलं . आता तर सोलापूरच्या सोहम येमूल या बालकलाकारानं बोलक्या बाहुल्यांच्या माध्यमातून ते साकारलंय. तेही थायलंडमध्ये. बोलक्या बाहुल्या म्हणजे कठपुतल्या. कालपासून थायलंडमध्ये हार्मनी पपेट फेस्टिवल सुरू झालंय. उद्या संपेल.
मीरा- रामायण हे थायलंडचं राष्ट्रीय महाकाव्य आहे. रामायणाचा पगडा त्या देशावर इतका आहे, की तिथल्या राजाला राम म्हणत. त्यांच्या जुन्या राजधानीलाही अयोध्येप्रमाणे अयुथया असं नाव होतं.
मोहन- त्यामुळे सोहमच्या रामायण कथेच्या कठपुतलीच्या माध्यमातून होणाऱ्या सादरीकरणाला जास्तच महत्त्व आहे.
राम- अरे, मी तर ऐकलं, जपान, इंग्लंड, कोलंबिया, पेरू, यासारख्या आठ देशांतले कलाकार त्यांची कला इथे सादर करणार आहेत. गदिमांच्या गीतरामायणाचा वापर तो या सादरीकरणात करणार आहे. त्या सादरीकरणात तो ज्या बाहुल्या वापरतो, त्या त्याची
'''मंथन-४'''
आई सोनाली आणि वडील शाम येमूल यांनी तयार केल्या आहेत. रामकियन म्हणजे थायी रामायण आणि वाल्मिकी रामायण यांना जोडणारा दुवा ठरणार आहे सोहम.
मीरा- आहे तरी केवढा हा सोहम?
मोहन- तो दमाणी प्रशालेत नववीत शिकतो आहे. ओठ न हलवता बाहुल्यांशी बोलणं तो शिकला आहे. सर्वात कमी वयाचा बोलक्या बाहुल्या आणि कठपुतली कलाकार म्हणून त्याची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे.
राम- साडेतीन वर्षाचा असल्यापासून तो बोलक्या बाहल्यांचा सराव करतो म्हणे. शिवाय इंडिया फाइट्स अगेन्स्ड कोविड या लघुचित्रपटासाठी त्याला लंडनच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत ४ हजार स्पर्धकांमध्ये दुसरा नंबर मिळाला होता.
मीरा- राम भावजी, हा चहा. तुम्ही आल्यापासून आपण बोलतच बसलो आहोत.
मोहन- तोंडाला कोरड पडली असेल ना.
राम- मोहन, अरे आठवड्यानं भेटलो नं आपण. त्यामुळे आठवड्यातल्या साचलेल्या गप्पा. आणखी काय?
मीरा- तेव्हा सोहमच्या कामगिरीबद्दल - ती सेलिब्रेट करण्यासाठी हा चहा समजा. पण सोलापूरकरांच्या पराक्रमाचा विचार करताना त्याच्याचबरोबर सोलापूरची लेक गंगा कदम हिच्याही पराक्रमाची आठवण ठेवा.
मोहन- हो ना. भारतीय महिलांच्या संघानं दिव्यांग म्हणजेच दृष्टिहीन महिलांची टी २० विश्वचषक स्पर्धा जिंकली. उपान्त्य फेरीत त्यांनी ऑस्ट्रेलियन महिलांचा पराभव केला होता, शेवटी नेपाळ संघाचा सात गडी राखून पराभव केला आणि विश्वचषकावर भारताचं नाव कोरलं.
मीरा- आणि या विजयात सोलापूरच्या गंगाचा महत्त्वाचा वाटा आहे.
'''मंथन-५'''
राम- मीरा वहिनी, विश्वचषक स्पर्धेत सध्या भारताचं नाव गाजावं असंच काम कबड्डीच्या मैदानावरही महिला संघानं केलं आहे. महिला विश्वकरंडक स्पर्धेत कबड्डीत दुसऱ्यांदा या संघानं विजेतेपद खेचून आणलं आहे.
मोहन- भारतीय क्रीडाविश्वाला सध्या चांगले दिवस आलेले दिसताहेत. भारतीय मुष्टियोध्यांनीही नऊ सुवर्ण पदकं मिळवली, तर महिलांनी मिळवली सहा सुवर्णपदकं.
राम- आणि लक्ष्य सेननं ऑस्ट्रेलियन ओपनचं जेतेपद पटकावलं ते विसरलास वाटतं. मग चाय तो बनताही है.
मीरा- थंडी ओसरली असली तरी –
मोहन- चहा तो चहा. थंडी ओसरली असली तरी दुपारसारखं ऊन तर नाही ना?
राम- पण या हवामानातल्या सारख्या सारख्या बदलांमुळे आजारपणं वाढताहेत.
मीरा- सर्दी, खोकला जिकडे तिकडे ऐकू येतोय.
मोहन- त्यासाठी तुझा रोजचा व्यायाम चालू आहे की नाही?
राम- पळतोय, पळतोय. पण तुम्ही? तुमची योगासनं, प्राणायाम चालू आहे की नाही?
मीरा- आहे तर! म्हणून तर आम्हाला सर्दी, खोकला झाल्याचं पाहिलं आहे का तुम्ही?
राम-हं, चांगलंच आहे मीरा वहिनी हे. आमच्या शेजारचे काका सध्या सर्दी पडशानं इतके बेजार आहेत, की ते मुंबईला गारमेंट फेअरला जाऊच शकले नाहीत.
मोहन- ते तर तिथे स्टॉल टाकणार होते नं?
राम- हो नं. मग त्यांनी त्यांच्या चिरंजीवांना तिकडे पाठवलं. युनिफॉर्म गारमेंट फेअर आहे ना ती. त्यांचा गणवेश तयार करण्याचा व्यवसाय आहे.
मीरा- मोठं प्रदर्शन आहे वाटतं ते. जवळपास दीडशे स्टॉल असतील तिथे. ४० देशांचे प्रतिनिधी या प्रदर्शनाला भेट देतील अशी कल्पना आहे.
'''मंथन- ५'''
मोहन- त्याचं काय आहे मीरा, सोलापूर जसं चादरींसाठी किंवा शेंगाचटणीसाठी प्रसिद्ध आहे, तसं गणवेश तयार करण्यासाठीही आता सोलापूरची प्रसिद्धी झाली आहे.
राम- इथे प्रशिक्षित मनुष्यबळ आहे, कुशल कारागीर आहेत. त्यामुळे जगभरात आता आपलं सोलापूर गणवेशांची राजधानी म्हणून प्रसिद्ध पावणार आहे म्हटलं.. तिथे गणवेशांची किती डिझाइन असावीत? हजारो डिझाईन्स सादर केली जाणार आहेत म्हणे. हे नववं प्रदर्शन आहे. त्यातून मोठ्या प्रमाणात सोलापुरात रोजगार उपलब्ध होतील अशी अपेक्षा आहे.
मीरा- तसं झालं तर चांगलंच आहे.
राम- अरे, मला एकदम आठवलं, तू परवा २६ तारखेला माझ्याकडे येणार होतास त्याचं काय झालं?
मोहन- येणार होतो, पण शक्य नाही झालं. त्या दिवशी २६-११ चा स्मृतिदिन होता आणि संविधान दिन. त्यामुळे आमच्या गल्लीत स्मृतिदिनी हुतात्म्यांना श्रद्धांजलीचा कार्यक्रम होता. त्याची तयारी करायची होती.
मीरा- त्याच दिवशी संविधान दिनही होता. रोहितच्या शाळेत वक्तृत्व स्पर्धा होत्या.
राम – स्पर्धेत रोहितनं भाग घेतला होता वाटतं?
मोहन- हो नं. त्याची तयारी करून घ्यायची होती. संविधान हे लोकशाही भारतासाठी किती आवश्यक आहे, ते त्याला समजावून सांगायचं होतं. २९ ऑगस्ट ४७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली आपल्या घटनेच्या मसुदा समितीची झालेली स्थापना ते ४ नोव्हेंबर ४८ ला तयार झालेला अंतिम मसुदा ही वाटचाल कशी झाली ते त्याला सांगितलं.
मीरा- आणि मुख्य म्हणजे आपल्या घटनेनं म्हणजे संविधानानं आपल्या सर्व नागरिकांना दिलेली समान संधी कशी महत्त्वाची आहे हे त्याला समजावून सांगितलं.
'''मंथन-६'''
राम- मला काही याबाबत फारशी माहिती नाही, पण मला हे सांग, २६ नोव्हेंबरला संविधान दिन कसा?
मोहन- सांगतो. २६ नोव्हेंबरला संविधान दिन अशासाठी, की २६ नोव्हेंबर१९४९ ला आपण तो संविधान मसुदा स्वीकारला. त्यानंतर २६ जानेवारी १९५० रोजी आपण ते लागू केलं.
राम- धन्यवाद मोहन. माझ्या ज्ञानात भर घातल्याबद्दल.
मीरा- रामभावजी, त्यामुळेच काही दिवसांपूर्वी बऱ्याच नक्षलवाद्यांनी जेव्हा शरणागती पत्करली तेव्हा त्यांनी संविधानाची शपथ घेतली. भारतीय घटनेचे पाईक असल्याचं त्यांनी त्यातून मान्य केलं.
मोहन- ही होती, सकारात्मक क्रांती.
राम- पुन्हा एकदा धन्यवाद मोहन. काय आहे, आपण अशा माहितीकरता तुम्हा दोघांवर अवलंबून असतो ना. तुमच्यासारखं आमचं वाचन कुठंय?
मीरा- काय हे रामभावजी. काय लाजवता आम्हाला?
राम- खरं आहे ते बोलतो मीरा वहिनी. बोलता बोलता किती वाजले ते विसरलोच होतो. तेव्हा चलतो .
मोहन- हो, पुन्हा भेट पुढच्या शनिवारी—