sitename_image

मानस-मंथन

मंथन श्रुतिका ८ ऑगस्ट २६

राम- या मोहनराव. तुमच्याच घरी तुमचं स्वागत आहे.

मीरा- आले वाटतं हे. हं, द्या ती पिशवी माझ्याकडे.

मोहन- अरेच्चा! आहे काय हा प्रकार? माझ्याच घरी माझं स्वागत रामकडून! मी येतो की नाही तो मीरा माझ्या हातातून पिशवी घेतेय!

मीरा- भले! म्हणजे तुम्ही भाजी घेऊन आलात, जिना चढून आलात म्हणून मी पिशवी घेतली तुमच्याकडून ते कुठेच गेलं!!

राम- आणि तू सकाळी सकाळी भाजी आणलीस म्हणून तुझं स्वागत केलं तेही कुठेच गेलं!

मोहन- म्हणजे अशा स्वागताची किंवा माझ्या हातातून पिशवी कोणी घेईल याची सवय नाही ना मला!

मीरा- हो ना. तसंही सकाळी सकाळी तुम्ही बाजारात जाऊन भाजी आणाल याची तरी सवय कुठे आहे म्हणा मला!

राम- मीरा वहिनी, मी तुमच्याकडे शनिवारी येतो तेव्हा मी भाजी तरी घेऊन इथे येतो किंवा इथून घरी जाताना भाजी घेऊन जातो की नाही?

मीरा- जाऊ दे हो रामभावजी. आज त्यांनी भाजी आणली आहे नं, मग झालं तर. माझी एक खेप वाचली भाजीबाजारातली.

राम- काय रे मोहन, आज तू आणलीस तरी काय भाजी? काही विशेष? का कुणी पाहुणे येणार आहेत?

मोहन- पाहुणे वगैरे कोणी येणार नाहीये, हा दुध्या भोपळा, काकडी, आणि---

मीरा- आणि पावसाळी रानभाज्या आणल्यात की नाही?

मंथन-२

मोहन- आणल्या तर. ही कर्टोली, अळू, चंदनबटवा.

राम- प्रथिनं , लोह, जस्त, जीवनसत्वं भरपूर असलेल्या रानभाज्या आपल्याला इतर दिवसात मिळत नाहीत, पण सध्या मिळू लागल्या आहेत असं वाचलं मी. पोटाच्या विकारांवर उपयुक्त, ॲंटी बॅक्टेरियल गुण असलेल्या, सर्दी खोकल्यावर गुणकारी आणि एकूणच आपली प्रतिकार शक्ती वाढवणाऱ्या या भाज्या मिळतील तेव्हा खायलाच हव्यात.

मीरा- थोडा पाऊस आला की जशी बाग बहरते, तशी भाज्यांनाही टवटवी येते. मग काय, पालेभाज्यांची लयलूट. मात्र या भाज्या ओळखता मात्र यायला हव्यात.

मोहन- या रानभाज्यांवरून आठवलं, तू कधी पावसाळी सहलीला गेलायस का राम?

राम- नाही रे, आपण जाऊ या का? काय मीरा वहिनी, तुमचं काय म्हणणं आहे?

मीरा- जाऊ या की. आपल्याकडे फारसं काही नाही, पण सह्याद्रीच्या घटमाथ्यावर या काळात रानफुलंही खूप बहरतात म्हणे.

मोहन- कासच्या पठारावर तर फुलांचा खजिनाच असतो की.

राम- अगदी कासचं पठार नाही गाठलं, तरी घाटात , सह्याद्रीच्या पठारांवर पिवळ्या, निळ्या, जांभळ्या अशा रानफुलांचे ताटवेच्या ताटवे पाहायला मिळतात. गेल्या वर्षी मी मुंबईला या दिवसांत गेलो होतो तेव्हा रेल्वे रुळांच्या दोन्ही बाजूंना या फुलांनी नुसता पिंगा घातला होता.

मीरा- चला, मग कधी जायचं? ठरवा. तिकडे छान पाऊसही बघू. यंदा तर आपल्याकडे एखादी वेळ वगळता वरुणराजा नुसता सडा टाकून जातोय.

मोहन- पण जून महिन्यासारखी दडीच मारली नाहीये ना त्यांनं?

राम- नाही. नाही. या आष्लेषा नक्षत्रात पंढरपूर आणि मंगळवेढा भागात त्यानं जोरदार

मंथन-३ सुरुवात केली आहे. नाही नाही म्हणता विदर्भात सरासरी गाठली आहे.

मीरा- दुपारी छान उकडायला लागतं आणि संध्याकाळी एकाएकी एखादी सर येते.

मोहन- पण मीरा, तू म्हणतेस तसं पाऊस आला असं म्हणेपर्यंत तो थांबतोय.

राम- ढग दिसतात तर काळे, पण त्यांच्यात बाष्पाचं प्रमाण कमी आहे. त्यामुळे वारा आला की निघून जातात.

मीरा- पण हवामान तज्ज्ञ म्हणताहेत बाई, परतीचा पाऊस चांगला पडेल. त्यामुळे सरासरी गाठली जाईल. म्हणजे आतापर्यंत जी रोपं लावली आहेत, ती चांगली जोमानं वाढतील. हत्तूरपासून कर्नाटकातील विजयपूरपर्यंत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं रस्त्याच्या दोन्ही बाजूंना तब्बल दहा हजार झाडं लावली आहेत. मग आपण जी वर्षा सहल काढायची म्हणतोय, ती तिकडेच काढू या की.

मोहन- मीरा, कल्पना चांगली आहे, पण मीरा, या वेळी आपण तिकडे नको जायला. पुढच्या वर्षी तिकडे जाऊ म्हणजे तोपर्यंत ती बऱ्यापैकी मोठी होतील.

राम- तिकडे काही मिरवणुका वगैरे नाही ना निघत? '''का''' काय? मिरवणुकांच्या जोषात रस्त्याच्या कडेला असलेल्या बिचाऱ्या रोपांचं वाटोळं व्हायचं.

मीरा- तिकडे कुठली मिरवणूक राम भावजी?

मोहन- तसं काही होणार नाही मीरा. आणि सांगू का, मिरवणुकांचं म्हणशील तर सोलापूर हे मिरवणुकांचं शहर आहे.

राम- तू म्हणतोस ते खरं आहे मोहन, पण त्या आपल्या मिरवणुकांच्या शहरानं डॉल्बी न वाजवण्याचा जो निर्णय घेतला आहे, तो आतापर्यंत कायम ठेवला आहे. सर्वांपुढे आदर्श घालून दिला आहे.

मंथन-४

मीरा- नुकतीच अण्णाभाऊ साठे जयंती झाली की नाही? त्यावेळी त्यांच्या पुतळ्याला फुलांची सजावट केली, शहरात ८५ पेक्षा जास्त मंडळांनी उत्सवात भाग घेतला. त्या निमित्तानं रक्तदान शिबीर घेतलं.

मोहन-आणि आता त्या उत्सवाची सांगता होणार आहे मिरवणुकीने. ९ तारखेला .म्हणजे उद्या. त्या मिरवणुकीत ५५-६० मंडळं सहभागी होतील.

राम – तेव्हाही डॉल्बी वाजू नयेत.

मीरा- नाही वाजणार. पण काय हो रामभावजी, १ऑगस्टलाच लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी होती. त्या दिवशी लोकमान्यांच्या नावानं दिला जाणारा पुरस्कार राष्ट्रीय सुरक्षेची जबाबदारी उचलणारे अनुभवी तज्ज्ञ अजित डोवाल यांना दिला गेला. तो कार्यक्रम झाला पुण्यात,---तेव्हा पुण्यात असतो, तर नक्की त्या कार्यक्रमाला जाता आलं असतं-

मोहन- पण आपण त्यांचं भाषण टीव्हीवर आणि समाजमाध्यांवर ऐकलंच की. मी ऐकलं, तुम्ही ऐकलंत की नाही?

राम- खरंच , जग किती वेगानं बदलतंय, नं!

मीरा- संगणकानं क्रांती केली, आणि स्मार्ट फोननं तर कमालच केली.

मोहन- रेडिओ, कॅमेरा, फोन, पत्र या सर्वांना या स्मार्ट फोननं गिळंकृत केलं,

राम- फक्त तेवढंच नाही, तुमच्या पैशाच्या पाकिटाचीही जागा त्यानं घेतली आहे. हातातल्या फोननं तुम्ही बिलंही भरू शकता, वस्तूही खरेदी करू शकता.

मीरा- यूपीआय व्यवहारानं यंदा देशात नवा उच्चांग गाठला आहे म्हटलं. साडेतेवीस अब्ज व्यवहार जुलैमध्ये या फोनवरून केले गेले. विशेष म्हणजे भारताबाहेरही ही सिस्टिम स्वीकारली गेली आहे.

मंथन-५

मोहन- मीरा, फक्त या बाबतीच नाही, तर क्रीडांगणावरही भारतीयांनी मोठी चमक दाखवली आहे ते माहीत आहे नं? राम- राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांबद्दल म्हणतोयस ना तू?

मोहन- हो. भारताला १३ सुवर्ण, १७ रौप्य,९ कास्य पदकं मिळाली.

मीरा- मागच्या बर्मिंगहममधल्या भारताच्या कामगिरीपेक्षा यंदाची कामगिरी थोडी डावी नाही का वाटत?

मोहन- हो, त्यावेळी ६१ पदकं आपल्या संघानं मिळवली होती. त्यापेक्षा हा आकडा नक्कीच कमी आहे, पण यंदा काय झालं आहे माहिती आहे का, या वेळी ग्लासगोमध्ये स्पर्धांसाठी केवळ १० खेळांचा समावेश होता. पण मागच्या वेळी एकूण १९ खेळ होते. बॅडमिंटन, कुस्ती, नेमबाजी, हॉकी, टेबल टेनिस, क्रिकेट हे खेळ यावेळी नव्हतेच. हे खेळ हे भारताचं बलस्थान होतं. त्या खेळांमध्ये भारताला तब्बल ३० पदकं मिळाली होती.

राम- यावेळी बॉक्सिंग हे आपल्या संघाचं बलस्थान ठरलं. मुष्टियोद्ध्यांनी ७ सुवर्ण आणि ३ रौप्य पदकं जिंकली. भारोत्तोलनातही आपल्या खेळाडूंनी चांगली कामगिरी केली. त्यात ८पदकं मिळवली. ज्युडोमध्ये ४ पदकं. पॅरा खेळाडूही सरस ठरले.

मीरा- पुढच्या राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये आपल्या खेळाडूंचाच नाही, तर आपल्या संयोजकांचाही कस लागणार आहे, कारण २०३० मधल्या राष्ट्रकुल स्पर्धा भारतात अहमदाबादला होणार आहेत.

राम- मीरा वहिनी, त्याला अजून अवकाश आहे. पण मोहन भाजी घेऊन आला आहे, आपण बोलून दमलो आहोत, तेव्हा-

मीरा- तेव्हा तरतरी आणणारा चहा मी गॅसवर ठेवला आहे.

मोहन- भाजी आणून मी फक्त दमलो नाहीये, भूकही लागली आहे,

मीरा- मला तेही माहीत होतं, तेव्हा हा उपमा. पाठोपाठ चहा येतोच आहे. आज दुसरा शनिवार. तेव्हा सुट्टीमुळे तुम्ही उशीरा जेवणार, हो नं?

मंथन-६

राम- वा! वहिनी, तुम्ही किती पुढचा विचार केलाय, हो नं?

मीरा- पुढचा विचार करून त्याप्रमाणे आपल्या कामाची आखणी करतो, तोच माणूस यशस्वी होतो म्हटलं.

मोहन- म्हणूनच सोलापूर आता सोलारपूर व्हावं म्हणून जोरदार प्रयत्न चालू आहेत.

राम- तसाही सूर्यनारायणाचा वरदहस्तच आहे आपल्या सोलापुरावर.

मोहन- म्हणून तर! ऊर्जा ही प्रत्येक माणसाची, प्रत्येक उद्योगाची गरज आहे . होर्मूझची सामुद्रधुनी युद्धक्षेत्र झाल्यावर सगळं जग त्या आगीत होरपळून निघालं ते त्यामुळेच. मग सूर्यनारायणाची कृपा असताना आपण त्याचा जास्तीतजास्त उपयोग करून घ्यायलाच हवा, हो की नाही?

मीरा- हो तर. खासगी आणि शासकीय जागांवर सौर पॅनेल बसवले जाताहेत. रोज २४० मेगावॉटहून जास्त विजेची निर्मिती आपल्याकडे होते आहे.

राम- हो. कालच मी वाचलं, जिल्ह्यात सौरऊर्जा निर्मितीचे ४० हून जास्त प्रकल्प चालू झाले आहेत.

मीरा- राम भावजी, उपमा खाऊन झाला असेल तर हा गरमागरम चहा.

मोहन- आणि मोहन, या गरमागरम चहाबरोबर एक तेवढीच गरमागरम बातमी ऐक. तू पेपर फारसा वाचत नाहीस म्हणून सांगतो, हिरज इथल्या रेशीम भवनात या आठवड्यात पहिल्यांदाच रेशीम कोषांच्या लिलावाचा आरंभ झाला.

राम- अरे, हे आमच्या काकांना सांगायला पाहिजे. दोन चार दिवस तर इतके गडबडीत गेले की मी पेपरला हातही लावू शकलो नव्हतो.

मंथन-७

मीरा- म्हणूनच सांगितलं भावजी. पहिल्याच दिवशी दीड लाखांची उलाढाल झाली. सोलापूर तसंही वस्त्रोद्योगासाठी प्रसिद्धच आहे. त्यात आता रेशीमउद्योगाचीही भर पडणार आहे.

मोहन- इतके दिवस आपल्याकडच्या रेशीम कोष उत्पादकांना कर्नाटकात जावं लागायचं. त्यांचं काम आता इथेच जवळ होईल.

राम- आमचे काका विविध प्रयोग करत असतात. आता ते रेशीम कोषांच्या उत्पादनाचा नक्कीच गंभीरपणे विचार करतील.

मीरा- शेतकऱ्यांना दुधाच्या उत्पादनाबरोबरच रेशीम उद्योगाचाही पूरक व्यवसाय म्हणून विचार करता येईल.

राम- आणि मीरा वहिनी, तुमच्या कपाटात आता लवकरच सोलापुरात झालेल्या रेशमाच्या साडीची किंवा ड्रेसची भर पडेल. हो की नाही?

मीरा- नक्कीच. मलाच काय आमच्या मैत्रिणींनाही त्याचा आनंदच वाटेल.

---------------------------------------------------

#ताजे लेखन #श्रुतिक